अमरावती शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेला नागपूर हायवे वरील "वेलकम पॉईंट" परिसर सध्या अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि भयानक परिस्थितीतून जात असून, तो गुन्हेगारी, अराजकता आणि वाहतूक कोंडीचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. या वाढत्या त्रासाला कंटाळून आज अर्जुन नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत अमरावतीच्या जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांना एक जाहीर निवेदन दिले.
नागरिकांनी निवेदनात प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, या परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स चालक रस्त्याच्या मध्यभागी अनधिकृतपणे बसेस उभ्या करून प्रवाशांची वाट पाहत थांबतात, ज्यामुळे पाठीमागील संपूर्ण वाहतूक ठप्प होते. या वाहतूक कोंडीची सर्वात अमानुष बाब म्हणजे, गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या आपत्कालीन रुग्णवाहिका देखील या कोंडीत २० ते २५ मिनिटे अडकून पडत आहेत आणि सतत सायरन वाजवूनही मुजोर बस चालक गाड्या बाजूला करत नाहीत. या बेशिस्त पार्किंगमुळे येथे रोज लहान-मोठे जीवघेणे अपघात घडत असून हा प्रश्न केवळ वाहतुकीचा राहिलेला नसून, सर्वसामान्य अमरावतीकरांच्या सुरक्षेचा आणि जिवाचा बनला आहे.
वाहतूक कोंडीच्या या समस्येसोबतच आता या संपूर्ण परिसराला अवैध आणि अनैतिक धंद्यांचा मोठा विळखा बसला आहे. परिसरात सर्रासपणे अंमली पदार्थांची (ड्रग्ज) विक्री, देहविक्रीचे सक्रिय जाळे आणि राजरोसपणे अश्लील चाळे चालत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खाजगी बसेसचे अनधिकृत थांबे तातडीने हटवून शहराबाहेर स्वतंत्र पिकअप पॉईंट निश्चित करण्यात यावा, तसेच परिसरातील अवैध धंदे व गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येत्या ७ दिवसांत या अवैध वाहतुकीवर, मुजोर ट्रॅव्हल्स चालकांवर आणि सुरू असलेल्या सर्व अवैध धंद्यांवर ठोस कारवाई करून वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढून हा परिसर गुन्हेगारीमुक्त करण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. प्रशासनाने या कालावधीत कारवाई न केल्यास स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची संपूर्ण नैतिक व कायदेशीर जबाबदारी प्रशासनाची राहील, असा थेट इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना नगरसेवक गुड्डू धर्माळे, माजी नगरसेवक गोपाल धर्माळे, प्रमोद खंडारे, विरेंद्र भट, राहुल इंगळे, विशाल पवार, विशाल पाचघरे, महेश तराळ, सचिन निस्ताने, निलेश खेडकर, नितिन धर्माळे, नवनीत पाचघरे, अभिजीत तायवाडे, स्वप्नील देशमुख, आदेश मैदानकर, प्रणव पुसतकर, भावेश मैदानकर, मोहित मैदानकर व अमोल साबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या