महसूल विभागाला आपल्या बापाची "प्रॉपर्टी" समजून जो तावडीत आला त्याला ""चरख्यात टाकून उसासारखा त्याचा पैशांच्या रुपात रस काढून त्याचे पार चिपाड"" करण्याचा उदयोग काही नीच प्रवृत्तीच्या महाभागांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला असून जसजसे त्यांचे दिवस भरत आहेत तसतसे ते एसीबीच्या तावडीत सापडत आहेत.
आजही बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत आणि सेवानिवृत्तीला दीड ते दोन वर्षे बाकी असलेला किशोर शांताराम कऱ्हाळे हा लाचखोर ३०,००० रुपयांची लाच घेत असतानाच पंचांसमक्ष रंगेहाथ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळ्यात पकडला आहे.
अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यात मोताळा येथे येऊन ही कारवाई केल्याने जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तक्रारीची पडताळणी व लगेच सापळा कारवाई करून आरोपीच्या मुसक्या बांधून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने बुलढाणा जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील रहिवासी असलेल्या ६१ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची आजच दि.१/१२/२०२३ ला पडताळणी केली असता तलाठ्याने पंचांसमक्ष ३०,००० रुपयांची मागणी केल्याने तक्रारीत सत्यता आढळून आली.त्यामुळे लाचखोर तलाठ्याच्या मागणीनुसार आजच रक्कम द्यावयाची असल्याने तातडीने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती.
तलाठी साझा कार्यालय मोताळा, जिल्हा बुलढाणा याठिकाणी आज दि.१/१२/२०२३ ला आरोपी लोक सेवक किशोर शांताराम क-हाळे वय ५४ वर्ष,व्यवसाय-नोकरी,पद- तलाठी,तहसील कार्यालय मोताळा, जिल्हा बुलढाणा,याला ३०,००० रुपये लाच मागणी करून ती स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांचे शेतजमीनीच्या हिस्सेवाटीचे प्रकरण आलोसे याचे कडे दाखल करण्यात आलेले होते.नमूद प्रकरण मंजूर करण्याकरिता तक्रारदार यांनी तहसील कार्यालय मोताळा जि.बुलढाणा येथे रितसर अर्ज केला होता. आलोसे यांनी तक्रारदारास हिस्सेवाटीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी ३०,००० रूपयांची लाचेची मागणी केली होती.सापळा कारवाईमध्ये आलोसे यांनी ३०,००० रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे.बोराखेडी ता.मोताळा जि. बुलढाना येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई सापळा व तपास अधिकारी पो.नि.प्रवीण बोरकुटे, ला.प्र.विभाग,अमरावती यांचे नेतृत्वातील युवराज राठोड, विनोदकुमार धुळे,स्वप्निल क्षिरसागर व राहुल वंजारी यांच्या पथकाने केली आहे.


0 टिप्पण्या