मुख्याधिकारी बेंबरेंच्या मनमानीला चाप,लोहकरे यांची प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती...




      गेल्या काही महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन विभागात कुणीच नियमित प्रशासन अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील नगर पालिकांच्या विकासकामात अडसर निर्माण झालेला होता.तर जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये चालत असलेल्या मनमानी कारभाराने नागरिक अक्षरशः वैतागले होते.

    अकोट नगर पालिकेतील मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांच्याकडे अकोला येथील प्रशासन अधिकारी या पदाचा देखील अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याने त्यांनी अकोटच्या नगर पालिकेतील आपल्या कार्यालयात येणे जाणे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंदच केले होते. याचा अकोट शहरातील नागरिकांचे आरोग्य, विकासकामे व इतर प्रशासकीय कामांवर विपरीत परिणाम होऊन नगर पालिकेत मुख्याधिकारीच नसल्याने जणू काही कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कारच टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

   गेल्या काही दिवसांपासून अकोट शहरातील मोकाट फिरणारया डुकरांना "आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू" हा आजार झाल्याने दररोज किमान २५/३० डुकरे रस्ते,गल्ली,बोळात मरून पडलेली आढळून येत होती,त्याचा अकोट शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली तरी नगर पालिका प्रशासनाने नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना केली नाही वा तसे प्रयत्नही केले नाहीत.तर नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर असलेले मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी याबाबत कोणतीही तत्परता दाखविली नाही ही खेदाची बाब आहे.

    मुख्याधिकारी बेंबरे यांनी आपले मूळ पदाचे नियमित काम पाहून नंतरच प्रभार असलेल्या पदाचे काम करणे नियमानुसार अपेक्षित असतांना बेंबरे यांनी उलट प्रभार असलेल्या जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाच्या कामाला प्राधान्य देऊन अकोट नगर पालिकेला वाऱ्यावर सोडले होते.



    विद्रोही मराठाने याबाबत वारंवार लेखमाला देऊन अकोट शहरातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून हा विषय सर्व संबंधितांच्या लक्षात आणून दिला होता, त्याचाच परिणाम म्हणून शासनाने आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांची अकोल्याचे जिल्हा न.पा.प्रशासन अधिकारी या पदावर नियुक्तीचे आदेश जारी केले असून त्यांना आजच कार्यमुक्त करून उद्या दि.५/१२/२०२३ ला अकोल्यातील न.पा.प्रशासन अधिकारी या पदाचा प्रभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


     या आदेशानुसार अकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे हे त्या प्रभारी पदावरून आजच मुक्त झाले असून उद्यापासून त्यांनी नियमितपणे अकोट येथील कामकाज सुरू करणे अपेक्षित आहे,नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या