अमरावती विभागाच्या महसूल आयुक्त निधी पांडे ह्या आज अकोटला येत असून महसूल विभागातील कोणत्या विषयावर कुणाला काय चमत्कार दाखवितात हे गुलदस्त्यातच आहे.
त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नसून अगदी वेळेवर ठरलेला आहे.आज रविवारी शासकीय सुट्टी असल्याने अर्थातच कर्मचारी,अधिकारी यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही.तर ह्या दौऱयामागे कोणते नेमके कारण काय हेही सध्यातरी जाहीर झालेले नाही.
मात्र गेल्या दोन तीन महिन्यांपासून अकोटच्या महसूल विभागात ज्या काही अनपेक्षित घडामोडी सुरू असल्याने सर्वत्र होत असलेली महसूल विभागाची नाचक्की पाहता जवळपास ६५ एकरचा प्रचंड असा परिसर व अब्जो रुपयांची चल अचल मालमत्ता असलेल्या बंद पडलेल्या अकोट तालुका सहकारी सुतगिरणीच्या हर्राशी प्रकरणांत सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अकोट दौरा होत असल्याने नक्कीच काहीतरी आणि कुणाला तरी चमत्कार दाखविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ह्या सुतगिरणीच्या हर्राशी प्रकरणांत झालेल्या अनियमितता, खरेदी व्यवहार करतांना झालेला "आतबट्ट्याचा" व्यवहार,यात शासनाचे चुकविण्यात (बुडविण्यात ) आलेले मुद्रांक शुल्क,स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्राम सेवकांनी घेतलेली (नुकसान कारक ) दुटप्पी भूमिका महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी खरेदी व्यवहारानंतर फेरफार प्रकरणी चालविलेली "पोट्टेशाही" तर संबंधित यात अपिलात गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपिलकर्त्यांसोबत केलेली "धत्तूरेबाजी" आणि आता सुरू असलेली न्यायालयीन अवमानने प्रकरणीची "कोर्टबाजी" आणि यासर्व शह कटशहाच्या राजकारणाने सुतगिरणीच्या कर्मचाऱ्यांचा झालेला "फुटबॉल" यामुळे महसूल विभाग पुरता ढवळून निघाला असून त्याबाबत महसूल विभागाची,शासनस्तरावर मलिन होत असलेली प्रतिमा,सुधारण्यासाठी,
तसेच यात स्थानिक लोक प्रतिनिधींनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळे झालेली पक्षाची हानी, यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळी वरून दखल घेण्यात आलेली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मतदारसंघात भाजपची सुतगिरणीमूळे मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू करण्यात आल्या असून त्याबाबत सत्य व निर्णायक माहिती घेऊन अकोट मतदारसंघात भाजपविषयी तयार झालेली मतदारांची नकारात्मक भावना बदलण्यासाठी काही दमदार पावले उचलण्यात येणार असल्याचे कळते.
सूतगिरणी प्रकरणांत महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेंला "आगाऊपणा" आणि केलेले नसते उपदव्याप हे चौकशीअंती त्यांच्याच अंगाशी येणार आहेत हे मात्र विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्या आजच्या दौऱ्याचे फलित असणार आहे हे १००% खरे.
त्यामुळे सूतगिरणी किती लोकांचा "जीव घेणार" हे आज रोजी निश्चित नसले तरी भविष्यात मात्र दिसणारच आहे.राजकारण्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी मदत करणाऱ्या,ह्या राजकारणी लोकांच्या जहाजात पाणी शीरत असल्याने काही नव्हे तर बरेच उंदीर बाहेर पडत असतांना त्यांच्या जहाजात पाणी आत शिरू नये म्हणून "भोकं" बंद करण्यासाठी पुढे येत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना मात्र आपला जीव गमवावा लागणार आहे,आणि ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे.नेमका हाच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांचा दौरा असून कर्मचारी,अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्याचा मुद्देसूद अहवाल वरीष्ठाना सादर केल्या जाणार असल्याचे माहितगार गोटाचे म्हणणे आहे.
शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजकारणाशी काही एक देणे घेणे नसले तरी सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे "सिस्टीम"मधील अधिकाऱ्यांचे कर्तव्यच आहे.आणि नेमके हेच कर्तव्य पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त निधी पांडे ह्या अकोटच्या दौऱ्यावर येत असल्याचे कळते,ह्या दौऱ्यात गौणखनिज प्रकरणांत अकोट विभागात होत असलेल्या अनियमितता आणि त्यामुळेच शासनाचे होत असलेले नव्हे तर जाणीवपूर्वक करण्यात येत असलेले नुकसान ह्या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.



0 टिप्पण्या