अकोला जिल्ह्यातील काही लोकांनी बदनाम केलेल्या अकोट नगर पालिकेत बोगसबाजीला उधाण आले असून जे प्रकार कुठेच होत वा झाले नसतील ते सर्व प्रकार याठिकाणी अगदी बिनधास्तपणे केल्या आणि करविल्या जात आहेत.म्हणूनच राज्यातील सर्वात जास्त बदनाम आणि अफलातून नगर पालिका म्हणून मागून आणि पुढून कायम क्रमांक एक वर अकोट नगर पालिका आहे.
राज्यात जर का कोणत्याही कंत्राटदाराला "ब्लॅक लिस्टेड" केल्या गेले असेल तर त्या कंत्राटदाराने अकोट नगर पालिकेतील कोणतेही टेंडर भरल्यास त्याला ते काम दिल्या जाईल याचीही खात्री अकोट नगर पालिकेतील संबंधित अधिकारी वा कर्मचारी देतील असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही.
अशाप्रकारच्या कामांमध्ये मग कुणीही कितीही तक्रारी केल्या तरी त्या कचऱ्याच्या टोपलीत टाकून त्या कामाची देयके अदा केल्या जातील,नाही कार्यालयीन वेळेत अशाप्रकारच्या कामांना वेळ मिळाला तर सुट्टीच्या दिवशी अर्थात रविवारी देखील बसून कामे केल्या जातील याचीही खात्री खास मर्जीतील माणसे देत आहेत.
अकोट नगर पालिकेच्या बांधकाम विभागातून प्रभाग क्र.१२ मधील सावरकर चौक ते वीर लहुजी साळवे चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्याचे कामाचे टेंडर काढण्यात आले होते.तेव्हा अंकित अरुण वानखडे नामक अकोला येथील कंत्राटदाराने या कामाचे टेंडर भरून हे काम घेतले होते.त्याचे टेंडर मंजूर झाल्यावर त्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली तेव्हा या कंत्राटदाराने तो कुठल्याही नगर पालिकेत वा कोणत्याही शासकीय विभागात ब्लॅक लिस्टेड अर्थात काळ्या यादित टाकल्या गेलेला नाही असे २०० रुपयांच्या स्टॅम्पपेपर वर देखील प्रतिज्ञापत्र लिहून दिलेले आहे.तसेच आजरोजी त्याने सदरहू काम देखील पूर्ण केले आहे.
मात्र काही दिवसांपूर्वी तो कंत्राटदार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर पालिकेत ब्लॅक लिस्टेड असल्याची माहिती मिळाल्यावर दर्यापूर नगर पालिकेतून याबाबत सविस्तर माहिती घेतली असता अंकित अरुण वानखडे नामक कंत्राटदाराने दर्यापूर नगर पालिकेत घेतलेले मुख्याधिकारी निवास बांधकामाचे काम वेळेत,व्यवस्थित व पाहिजे तसे न केल्यामुळे त्याला त्याठिकाणी ब्लॅकलिस्टेड केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या कंत्राटदाराने अकोट नगर पालिकेत फसवणूक करून काम मिळविल्याबाबत मुख्याधिकारी यांचेकडे शहरातील काही नागरिकांनी पुराव्यासह तक्रारी करून देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट त्याचे देयक काही प्रमाणात ( R.A.Bill )अदा केले असून त्याबाबत आलेल्या तक्रारींना कचऱ्याची टोपली दाखविली आहे.
अकोट नगर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी त्या कंत्राट्दारावर कोणतीही कारवाई न करता त्याला त्याचे देयक अदा करणे म्हणजे चोरांना पाठीशी घालण्याचा प्रकार असून इतर लोकांसाठी कायद्याची भाषा वापरणारे मुख्याधिकारी याच प्रकरणांत इतके दिलदार कसे झालेत ? आणि कशामुळे हा शहरातील नागरिक व नगर पालिकेत काम करणाऱ्या कंत्राटदारांना फार मोठा प्रश्न पडला आहे.
खोटी व चुकीची माहिती देऊन विश्वासघात करून काम मिळविल्याबद्दल त्यावर कोणतीही कारवाई वा गुन्हा दाखल न करता उलट जरा जास्तच मेहेरबान होऊन त्याचे देयकाचे पार्ट पेमेंट करणे म्हणजे अकोट नगर पालिकेतील अधिकारी,कर्मचारी व मुख्याधिकारी यांनी नगर पालिकेला आपली वैयक्तिक मालमता समजून,पदाचा दुरुपयोग करीत जवळच्या व्यक्तीला लाभ पोहोचविणे आणि त्यासाठी कट कारस्थान रचणे यासदरातील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होती अशाचप्रकारचे वर्तन केले आहे.
नरेंद्र बेंबरे हे अकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार प्रशासक सुद्धा आहेत.त्यामुळे त्यांच्याकडून अशा नियमबाह्य कृतीची अकोट शहरातील नागरीकांना अपेक्षा नाही तर नगर पालिकेच्या हितासाठी प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून पाहिल्यावरच कोणतीही कृती अपेक्षित आहे.मात्र स्वतःला अकोट नगर पालिकेचा सर्वेसर्वा समजून इतरांना दुय्यम वागणूक देण्यातच बेंबरे यांना धन्यता वाटत असल्याचे त्यांच्या प्रत्येक कृतीवरून दिसून येत आहे.आज रविवार असूनही सकाळी १० वाजतापासून ते नगर पालिकेतील आपल्या कार्यालयात बसून कोणती कामे करीत आहेत हे ते आणि त्यांच्या गोतावळ्यातील जवळच्या लोकांनाच माहीत.






0 टिप्पण्या