महसूल सप्ताहात लाच घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक देण्यात यावे...




    महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ऑगष्ट ते ७ ऑगष्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो.तसा तो प्रत्येक वर्षीच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.मात्र यावर्षीचे विशेष असे की राज्याच्या चारही भागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा महसूल सप्ताह लाच घेऊन साजरा केला,त्यामुळे राज्यातील महसूल विभागाचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले.त्यामुळे राज्याच्या राज्यपालांनी याची नोंद घेऊन महसुलच्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांची नावे राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक उपरोधिक पणे करीत आहेत.



     या सप्ताहाची सुरुवात वर्धा येथील एका नायब तहसीलदाराने लाच घेऊन केली तर त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तलाठी,नाशिक येथील तहसीलदार, बुलढाणा जिल्ह्यातील नक्कल विभागातील लिपिक, मराठवाड्यातील लातूर येथील तलाठी याने तर दुसऱ्यांदा लाच घेऊन चांगलीच साथ दिली तर संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या संत नगरीतील शेगाव तहसील मधील लिपिकाने सप्ताहाचा शेवट लाच घेऊन साजरा केला.


   शेगाव तहसीलच्या एका लिपीकास लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून सदर लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तहसीलचा लिपिक संदीप अर्जुनराव दाभाडे वय ४६ ह्याला दोन हजार पाचशे रुपयाची लाच घेतांना अटक केली आहे.

    तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती येऊलखेड तालुका शेगाव येथे असून,सदर शेतीला वारसाहक्काने, तक्रारदार यांचे वडील व काका यांचे नावे लावायची असल्याने त्याकरिता तुकडेबंदी आदेशानुसार सदर शेती नावावर करण्याकरीता अडचण येत होती. तक्रारदार यांनी सदरची शेती नावावर होण्याकरिता उपविभागीय अधिकारी, खामगाव यांचेकडे परवानगी मिळणेबाबत अर्ज केलेला होता. त्या अर्जावरून उपविभागीय कार्यालय खामगाव यांनी तहसिल कार्यालय, शेगाव यांना अहवाल मागीतला होता. सदरचा अहवाल तहसिल कार्यालय,शेगाव येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय,खामगाव येथे पाठविण्या करिता लिपिक संदीप दाभाडे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाच लुचपत प्रतीबंधक विभाग,बुलडाणा यांचेकडे केली होती.
त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता, आरोपीने तडजोडी अंती २ हजार ५०० रुपये लाच मागणी करून तहसिल कार्यालय शेगाव येथे लाच रक्कम स्विकारली असता पंचा समक्ष  दाभाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचे  विरुध्द पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे,एसीबी, बुलडाणा,यांचे नेतृत्वात सापळा पथकातील महेश भोसले पोलीस निरीक्षक, सफौ.शाम भांगे,पोहेकॉ.विलास साखरे, नापोकॉ. विनोद लोखंडे,जगदीश पवार,पोकॉ. शैलेश सोनवणे,मपोकॉ.स्वाती वाणी,चालक नितीन शेटे यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या