सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांचा कुणा अज्ञात व्यक्तीने खून केला असून त्यांचा मृतदेह सांगोला येथील केदारवाडी रोडवर आढळून आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) हे वासूद (ता.सांगोला) येथे रहात होते.ते जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यात वार करून त्यांचा खून केला.
रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूद- केदारवाडी रोडनजीक त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच संगोळ्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवीण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून तपास करीत आहेत.
सहा.पोलीस निरीक्षकांच्या खून प्रकरणाने पोलीस दल हादरले असून खुनी इसमाचा शोध लावण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.


0 टिप्पण्या