शिकाऊ तहसीलदाराची मनमानी,संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांची वणवण...




    गेल्या काही दिवसांपासून अकोट तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांना वेठीस धरून विनाकारण मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढले असून यात प्रामुख्याने याठिकाणी जून महिन्यापासून आलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदार विजय सवडे यांचा मोलाचा वाटा आहे.

     नुकतेच एमपीएससीची परीक्षा देऊन महसूल विभागात तहसीलदार पदावर निवड झालेले विजय सवडे यांना अकोट तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यांकरिता पाठविण्यात आलेले आहे.ते नुकतेच लागलेले असल्याने त्यांची नागरिकांसोबत वागणूक ही नाही प्रेमाची तर किमान सौहार्दाची असायला पाहिजे,आपण नोकरीवर लागलो तेच मुळात जनतेची कामे करण्यासाठी हे नजरेपुढे ठेवून व जनतेची सेवा  हेच आपले कर्तव्य आहे आणि त्याचाच आपल्याला मोबदला म्हणून पगार मिळतो व मिळणार आहे.आपला प्रशिक्षणाचा कार्यकाळ व्यवस्थित व चांगल्या रीतीने पूर्ण करुन नियमितपणे नोकरी करण्यासाठी पात्र ठरणे हे आजरोजी तरी विजय सवडे यांचे कर्तव्य आहे.मात्र सवडे हे स्वतःला साऊथ च्या सिनेमातील हिरो समजत असून नुकतीच मिळालेली तहसीलदारकी ही त्यांच्या डोक्यात घुसली असल्याचे त्यांच्या वागण्या बोलण्यावरून तरी जाणवत आहे.आणि याच तहसील कार्यालयात कार्यरत असलेले काही बदनाम व बेशरम लोकं त्यांची दिशाभूल करून व त्यांना चुकीचे मार्गदर्शन करून सवडे यांच्याशी "गेल्या जन्मातील दुश्मनी" काढत असल्याचे बाहेरच्या लोकांना स्पष्टपणे दिसत आहे मात्र सवडे यांना ते कळत नाही ही आश्चर्याची बाब आहे.त्यामुळे शिकाऊ तहसीलदार विजय सवडे हे दाढी ठेवून, स्टायलिश राहून स्वतःला जरी हिरो समजत असले तरी ते जनतेच्या,सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून पार उतरले असल्याने ते "व्हिलन"च ठरले आहेत.


   सिनेमातील ( विशेषतः साऊथच्या ) व्हिलन जसा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जसे उलटे पालटे,वा मानसिक त्रास देण्याची कामे करतो अगदी तशीच कामे हे सवडे महाशय करीत आहेत.यातील त्यांचा एक किस्सा आम्ही कालच सांगितलेला आहे.आता आज आणखी त्यांनी केलेला दुसरा प्रकार हा त्याहून वेगळा असून त्याने मात्र तालुक्यातील एक दोन नव्हे तर जवळपास चार ते पाच हजार लोकांना गेल्या महिनाभरापासून प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास होत आहे.आणि त्या लोकांना होत असलेला त्रास पाहून शिकाऊ तहसीलदार विजय सवडे हे प्रचंड खुश होत आहेत अगदी मिस्टर इंडिया मधील "मोग्याम्बो" सारखे.फक्त सवडे हे दाढीच्या थुटकांवर हात फिरवत  "मोग्याम्बो" खुश हूवा असे ते म्हणत नाहीत इतकाच काय तो फरक आहे.


   अकोट तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या वृद्ध, निराधार,अपंग, विधवा, परित्यक्ता महिला यांना गेल्या चार महिन्यां पासून शासनाचे एक रुपयाचेही अनुदान मिळाले नसल्याने त्या गोरगरीब व असहाय्य वृद्ध, निराधारांची पावसाळ्याच्या दिवसांत प्रचंड गैरसोय होत आहे,आणि याला "हिरो बनण्याच्या नादात अगदी छोटासा झिरो" झालेले शिकाऊ तहसीलदार विजय सवडे हेच जबाबदार आहेत.

     राज्य शासनाने संजय गांधी योजनेच्या अनुदान म्हणून दिल्या जात असलेल्या रक्कमेत चांगलीच घसघशीत वाढ केल्याची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.मात्र असे करीत असतानाच आधीपासून सुरू असलेल्या अनुदान वाटपाच्या पद्धतीत बदल केले असून सदरहू रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट आरटीजीएस द्वारे करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.मात्र ही पद्धत फारच क्लिष्ट व वेळखाऊ असल्याने आधी सर्व लाभार्थ्यांचे खाते आधार लिंक करून घेणे आवश्यक असल्याने पाहिजे त्या गतीने हे पूर्ण होऊ शकलेले नाही आणि याला प्रत्येक तालुक्यातील संजय गांधी विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता असणे हे मुख्य कारण आहे.त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी अजूनही जुन्याच पद्धतीने अनुदान वाटप सुरू आहे.त्यामुळे तिकडे कोणतीच बोंबाबोंब नाही.मात्र अकोट तालुक्यातील संजय गांधी विभागात अनुदान वाटपात प्रचंड घोळ झाला असून श्रावण बाळ योजनेच्या काही लाभार्थ्यांना अनुदान मिळाले तर काही लोकांना अजूनही ते मिळालेच नाही.तर संजय गांधी योजणेचे अनुदान कुणालाच मिळाले नाही.तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात दररोज शेकडो लाभार्थी चकरा मारत असून त्यांच्याशी कुणी धड बोलतही नसल्याने लाभार्थ्यांची प्रचंड मानसिक पिळवणूक सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आणि हे सर्व शिकाऊ तहसीलदार विजय सवडे यांच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.सवडे यांना संजय गांधी योजनेच्या अनुदान वाटपाची काहीच माहिती नाही तरी सुद्धा ते आपल्याच पद्धतीने कामे करून हजारो गोरगरीब लाभार्थ्यांना वेठीस धरत आहेत हे सर्वथा चुकीचे आहे.शासन देत असलेल्या अनुदानावर जीवन जगत असलेल्या लोकांच्या जीवना मरणाच्या प्रश्नात परिस्थितीचा विचार करून कृती करणे हेच अपेक्षित असतांना नियम व शासन आदेशांचा चुकीचं अर्थ काढून निराधारांना वेठीस धरणे म्हणजेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्यावर एकप्रकारे सुलतानी अन्याय करणेच आहे.


     अकोट येथे गेल्या महिना भरापासून नियमित तहसीलदार सुनील चव्हाण हे रुजू झालेले आहेत,तर उपविभागीय अधिकारी अरखराव हे दोन महिन्यापासून कार्यरत आहेत परंतु या वृद्ध,निराधार व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून शासनाच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित असल्याने त्यांची उपासमार होत असून त्यांना त्यांच्या दवापाण्या साठीही पैसे नसल्याने घरातच पाय घासून मरण्याची वेळ संबंधित अधिकाऱ्यांनी आणली असल्याने ते तहसील कार्यालयात येऊन कलकलाट करतात ते का दिसत नाही हा फार मोठा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.किंवा हे सगळे त्यांना दिसत असूनही न दिसल्यासारखे करून आपल्याच अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालत असल्याचे अगदी स्पष्टपणे जाणवत आहे.आतातरी अकोटचे नियमित तहसीलदार व एसडीओ यांनी गोरगरिबांच्या हक्काचे अनुदान त्यांना मिळावे यासाठी विजय सवडे यांना "सवड" काढून ते समजतील अशाप्रकारे समजावून त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्यास सांगणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या