जि.प.अध्यक्षांच्या पतीची शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती कशासाठी..?




   अकोला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ.संगीता नंदकिशोर अढावू ह्या आपल्या पदाचा "गैरवापर" करून आपल्या मर्जीतील कर्मचारी,नातेवाईक व पक्षातील नेतेमंडळी यांनाच लाभ वा फायदा होईल असे निर्णय घेत असल्याने जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान होऊन प्रशासनाची नाहकच जनमानसांत "प्रतिमा मलिन" होत आहे.

      जि.प.अध्यक्षा संगीता अढावू यांचे पती तेल्हारा तालुक्यातील मालठाना गावच्या जिल्हा परिषदच्या वर्ग पहिली ते चौथीच्या शाळेवर शिक्षक असून गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वीच त्यांचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात "प्रतिनियुक्तीचे" आदेश काढण्यात आलेले आहेत.आजरोजी जि.प.च्या शिक्षण विभागात असे कोणते काम वा अभियान सुरू आहे की त्यांना प्रतिनियुक्तीवर ह्याठिकानी घ्यावे लागले ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.त्यांचे हे आदेश काढतांना अनेक अनियमीतता झाल्या असून सरळसरळ नियम बाजूला सारून ते फक्त "अध्यक्षांचे पती" आहेत,एव्हढीच एक बाजू विचारात घेऊन हे आदेश तत्कालीन अधिकाऱ्यांनी काढले आहेत.हे आदेश काढण्यापूर्वी वरिष्ठांचे कोणतेही आदेश वा मार्गदर्शन मागविण्यात आले नाहीत.त्यामुळेच केवळ अध्यक्षांच्या सांगण्यावरून नियमबाह्यरित्या नंदकिशोर अढावू ह्यांचे अकोल्याला शिक्षण विभागात काहीही काम नसतांना अवैधरित्या प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्यात आले असल्याची जि.प.वर्तुळात चर्चा आहे.


   अध्यक्ष पती नंदकिशोर अढावू यांना शिक्षण विभागात कोणतेच काम नसून ते फक्त अध्यक्षांच्या केबिनमध्ये बसलेले वा जिल्हा परिषदचे आवारात इतरत्र फिरत असतांना येथे कामानिमित्त आलेल्या लोकांना दिसत असतात.अथवा ओळखीच्या वा नात्यातील लोकांची विविध विभागातील कामे करीत असताना ते लोकांच्या नजरेस पडतात. जि.प.अध्यक्ष यांच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असून आपल्या मित्रमंडळीसह याठिकाणी "गप्पांचा फड" मांडून बसलेले या रस्त्याने येजा करणाऱ्या लोकांना दररोज दिसून येतात.काही एक गरज वा कोणतेही प्रयोजन नसताना त्यांचे प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्याची काय गरज होती ? असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे.


   तेल्हारा तालुक्यातील दानापूर व हिवरखेड येथील ग्रामसेवकांच्या कामाबाबत आलेल्या तक्रारीची चौकशी करून विस्तार अधिकारी घुगे यांनी बीडीओ यांना दिलेला अहवाल गेल्या दोन महिन्यांत देखील अकोला सीइओ यांच्याकडे न पाठविण्यात देखील याच अध्यक्षपतींचाच हात असल्याचे उघडपणे बोलल्या जात आहे.यातील एक ग्रामसेवक त्यांचा नातेवाईक असल्याने त्यावर निलंबनाची कारवाई होवु नये म्हणून अध्यक्ष पतींनी केलेले प्रयत्न यामागे असल्यानेच तो अहवाल सीइओ यांच्या समोर गेलाच नाही, हेही तितकेच खरे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.तर प्रामाणिकपणे आपले काम करून बीडीओ ह्यांना अहवाल सादर करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध खोटी तक्रार देऊन त्यांचाच चौकशीच्या नावावर "मानसिक छळ" सुरू करण्यात आलेला आहे.एकंदरीतच (नंदू भाऊ) नंदकिशोर अढावू हे काहीतरी "वेगळेच धंदे" याठिकाणी करीत असल्याची शंका घेण्यास "वाव" मिळतो आहे.

   जिल्हा परिषदच्या अध्यक्षांचे पती असल्याचा गैरवापर करून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून जर का ते असे काही प्रकार करीत असतील तर ते चुकीचे असून त्याचे फार गंभीर परिणाम त्यांना व त्यांच्या अध्यक्ष पत्नीला भोगावे लागतील हे ही तितकेच खरे.हे काही प्रमाणात खरे असेल वा नसेल तरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भविष्यात जि.प.ची "फुकटात बदनामी" होऊ नये म्हणून अध्यक्षपती नंदकिशोर अढावू यांचे "वैध असो वा अवैध" प्रतिनियुक्ती आदेश रद्द करून त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठविण्यात यावे.आदर्श शिक्षक असलेल्या नंदकिशोर अढावू यांची 
खरी गरज ही मालठाण्यातील जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांना आहे. जिल्हा परिषदेत कंत्राटदार, ग्रामसेवक,शिक्षक वा इतरही कुणाला त्यांची कामे करून देण्यासाठी "आणखी" कुणीतरी मिळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या