अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आदिवासी भागातील धारणी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील देवेंद्र मधुकर खैरनार, शाखा अभियंता,या वर्ग २ च्या अधिकाऱ्याला कंत्राटदाराकडून तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारत असतांना आज पंचासमक्ष रंगेहाथ पकडून अमरावती एसीबीने प्रत्यक्षात पाणी पाजले आहे.
मेळघाटातील आदिवासी जनतेसाठी सत्तेत कोणतेही सरकार असले तरी तेथील गोरगरीब, सर्वसामान्य,विकासाच्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींना किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अब्जो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असते,मात्र काही झारीतील शुक्राचार्य त्यांच्या ह्या हक्काच्या निधीमध्ये "भोकं" पाडून त्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा "बेशरमपणा" काही अधिकारी व कर्मचारी करीत असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा "नालायकांना" वठणीवर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते मात्र आदिवासींच्या अज्ञानापायी म्हणा वा इतर कारणांमुळे हे आदिवासी एसीबी पर्यंत पोहोचू शकत नाहीत.
अशाच एका आदिवासी लोकांसाठी शासनाने ग्रामीण पाणी पूरवठा विभागाच्या माध्यमातून "हर घर जल" या योजनेची अंमलबजावणी करीत असतानाच या योजनेचे कामाचे कंत्राट घेतलेल्या यातील नेहरूनगर, धारणी येथीलच रहिवासी असलेल्या तक्रारदार यांनी दि. २६/०७/२०२३ रोजी तक्रार दिली की, देवेंद्र मधुकर खैरनार,शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग धारणी हे तकारदार यांनी मौजे धोदरा गावातील घर घर जोडणी योजने अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलाचे एम.बी बुक मंजुर करण्यासाठी व मेजरमेंट करुन बिल मंजुरीसाठी पाठविण्या करीता पहिला हप्ता चक्क १,००,०००/- रु. बँक खात्यावर घेतला व उर्वरीत ५०,०००रु लाचेची मागणी करत असल्याबाबत लेखी तक्रार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.२७/०७/२०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग धारणी येथील शाखा अभियंता देवेंद्र मधुकर खैरनार यांने मौजे धोदरा गावातील घर घर जोडणी योजने अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलाचे एम.बी बुक मंजुर करण्यासाठी व मेजरमेंट करुन बिल मंजुरीसाठी ५०,०००/- रु. लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले असता आज गुरुवार दि.२७/०७/२०२३ रोजी पंचासमक्ष आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक देवेंद्र मधुकर खैरनार,वय-३६ वर्ष,शाखा अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग धारणी जिल्हा परीषद अमरावती यांने तक्रारदार यांचेकडून धारणी येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयातच लाचेची रक्कम ५०,०००/- रु. पंचासमक्ष स्विकारली. बाजूलाच सापळा लावून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लगेच झडप मारून भ्रष्टाचारी आरोपी लोकसेवक देवेंद्र खैरनार याला ताब्यात घेतले असून त्यांचेविरुध्द पो.स्टे.धारणी जि.अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे..
सदरची कारवाई अमरावती एसीबीचे स्टार पोलिस निरक्षक केतन मांजरे यांच्या कारवाई पथकातील पो.नि.चित्रा मेसरे,पो.नि.विजया पंधरे, पो.कॉ.आशिष जांभोळे,पो.कॉ.शैलेश कडु, पो.ना.रितेश राठोड,पो.कॉ.उमेश भोपते पोउपनि सतिश किटूकले, पो.कॉ.स्वप्नील क्षिरसागर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


0 टिप्पण्या