काल बुधवारी रात्रीपासून विजांच्या कडकडाटासोबत झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे राज्याची उपराजधानी "स्मार्टसिटी" म्हणून सर्वत्र गवगवा करण्यात आलेल्या नागपूर शहराला अनेक भागात पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने पाण्याने अक्षरशः वेढा घातलेला दिसून येत होता.
या प्रकारामुळे स्मार्ट सिटी म्हणून निव्वळ घोषणाबाजी करून नावाजल्या जाणाऱ्या उप राजधानीच्या प्रशासनाचे दावे फोल ठरून सर्वत्र पितळ उघडे पडल्याचे जागोजागी दिसून येत होते. बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरु होता. विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाने थैमान घातले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते. तर पॉश समजल्या जाणाऱ्या वस्त्यादेखील पाण्याखाली होत्या. विदर्भात सर्वत्र पाऊस असला तरीही शहरात मात्र अजूनपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मात्र, बुधवारी रात्री पासून तर पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. बरेचसे अपार्टमेंट पाण्या खाली गेले तर खोलगट भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले.शहरातील बहूतांश भागातील रस्त्याच्या मात्र नद्या झालेल्या पहावयास मिळत होत्या. पॉश वस्ती म्हणून गणना होत असलेल्या बहुतेक भागांत नागरीकांची वाहने पाण्यात बुडाली होती. तर शहराच्या काही भागात दुचाकी पाण्यात वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.














0 टिप्पण्या