अकोला जिल्हाधिकारी कार्यालय बेवारस, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या,अकोल्याचे विश्वनाथ घुगे यांची वाशीमला रवानगी...



    आज राज्य सरकारने राज्यातील उपजिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून बदल्यांचे आदेश जारी केले असून त्यात अकोल्यातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची वाशीमला निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली केली असून अकोल्यातील बाळापूर याठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून एकेकाळी अकोल्यातच तहसीलदार पदावर काम केलेले राजेश्वर हांडे यांची नियुक्ती केली आहे.

    अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांचा प्रचंड तुटवडा असून विश्वनाथ घुगे हे एकटेच अकोल्यातील महसूल विभागाचे तारणहार म्हणून काम पाहत होते.ते येथून गेल्याने आजरोजी तरी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय बेवारस होणार आहे.अकोल्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग झालेले अमित शेवडे हे अद्यापही रुजू न झाल्याने त्या पदाचा प्रभार अकोल्याचे उपविभागीय अधिकारी पाहत असून घुगे यांच्याकडे भूसंपादन व्यतिरीक्त ,अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचाही प्रभार होता.त्याआधी अकोटच्या उपविभागीय अधिकारी व नगर पालिकेचे प्रशासक या पदांचाही अतिरिक्त प्रभार होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखीही इतर बऱ्याच विभागांचे ओझेही त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेले होते.नाही म्हणायला फक्त जिल्हाधिकारी याच पदाचा प्रभार त्यांना देण्यात आला नव्हता हीच एक दुःखाची बाब आहे.

      अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात घुगे हे येथून बदलून गेल्यावर कुणीच शिल्लक राहिले नसल्याने अगदी नव्यानेच आलेले, जिल्ह्याची वा कामकाजाची पुरती ओळखही न झालेले एकटे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनाच सगळे ओझे आपल्या खांद्यावर वाहावे लागणार असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या