तुकाराम मुंढे येताच, पहिल्याच दिवशी FDA चा कारवाईचा धडाका...



   महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हातात घेताच FDA ने राज्यभरात धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेते, निकृष्ट दर्जाचे तूप व खवा उत्पादक तसेच रसायनांच्या सहाय्याने फळे पिकवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    मंगळवार २६ मे रोजी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली. येथे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवीण्यात आलेले तब्बल ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्यास घातक रसायनांचा वापर करून फळे पिकवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

    त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. स्थानिक FDA च्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तब्बल ४० हजार ९६० रुपयांचे संशयित तूप जप्त केले. या प्रकरणात संबंधित विक्रेते आणि उत्पादकांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    दरम्यान बुधवार २७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. येथे तब्बल २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. या खव्याची किंमत अंदाजे ४७ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.

     “भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

    तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक,शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासन शैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय पदांवर काम करताना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे FDA विभागात त्यांच्या नियुक्तीनंतर अन्नभेसळ, बनावट औषधे, परवान्यांतील गैरव्यवहार तसेच ऑनलाइन औषध विक्रीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

   राज्यभरातील नागरिकांकडून या कारवायांचे स्वागत केले जात असून “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई व्हावी” अशी मागणी जोर धरत आहे. FDA विभागाची ही धडक मोहीम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या