सेंट्रल बँकेच्या मिनी बँक संचालकाचा महिला बचत गटांच्या लाखो रुपयांवर डल्ला...



ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या "मिनी बँक" (BC पॉईंट) संकल्पनेला हरताळ फासणारा एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील मुऱ्हा देवी येथे उघडकीस आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मिनी बँक संचालकाने परिसरातील १० ते १२ बचत गटांतील महिलांची सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    मुऱ्हा देवी येथील बचत गटाच्या महिला मागील काही दिवसांपासून आपल्या हक्काचे पैसे काढण्यासाठी मिनी बँकेत चकरा मारत होत्या. मात्र, संचालक दरवेळी काहीतरी कारण सांगून महिलांना रिकाम्या हाती परत पाठवत होता. संशय बळावल्याने या महिलांनी थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अंजनगाव सुर्जी शाखेत जाऊन चौकशी केली. बँकेने तपासणी केली असता, महिलांकडे असलेल्या पैसे भरल्याच्या पावत्या बनावट असल्याचे समोर आले. मिनी बँक संचालकाने महिलांकडून पैसे तर घेतले, पण ते बँकेच्या मुख्य खात्यात जमाच केले नसल्याचे निष्पन्न झाले.

    सेंटर बँक ऑफ इंडिया शाखा अंजनगाव सुर्जी येथे मंगळवार दिनांक २६ रोजी दुपारी ५ वाजता ही चौकशी सुरू झाली. बँक प्रशासनाने केवळ दोन तास प्राथमिक चौकशी केली असता, फक्त तीन बचत गटांचे मिळून १० लाख रुपये गायब असल्याचे दिसून आले. अद्याप ७ ते ८ बचत गट आणि इतर वैयक्तिक खातेदारांची चौकशी होणे बाकी आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा ४० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून उद्यापर्यंत चौकशी पूर्ण होणार असल्याने मिनी बँक संचालकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे .

    ग्रामीण भागात बँकेचा ताण कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे BC पॉईंट्स सुरू करण्यात आले होते. मात्र, अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे सामान्य शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी महिलांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास धोक्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलीस तक्रार आणि सखोल चौकशीची मागणी बचत गटाच्या महिलांनी केली आहे.

मिनी बँक संचालकांने बनावट पावत्यांचा केला वापर...

    या घोटाळ्यात संचालकाने अत्यंत चलाखीने बनावट पावत्यांचा वापर केला. राष्ट्रीयकृत बँकेचे नाव असल्याने नागरिकांनी विश्वासाने पैसे जमा केले होते. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम बँकेपर्यंत पोहोचलीच नाही. यामुळे "राष्ट्रीयकृत बँकांच्या या मिनी बँकांवर नक्की नियंत्रण कुणाचे?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत  असून इतरही मिनी बँकेच्या चौकशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या