वंचितांना राजकीय ताकद देणारा लोकनेता : ॲड. प्रकाश आंबेडकर..!




आज १० मे, २०२६ बहुजनांचे हृदयसम्राट, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा ७२ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा आणि सन्मानाचा जयभीम.


 जन्म, शिक्षण व राजकारणात प्रवेश:
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म १० मे, १९५४ रोजी मुंबई येथे झाला. ते कालकथित यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर आणि  महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट सॅन्टेनिस लेन्स हायस्कूल, मुंबई येथे झाले असून त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई येथून कायद्याची पदवी घेतली आहे. 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे १४ ऑगस्ट, १९८० मध्ये पहिल्यांदा अकोल्यात आगमन झाले तेव्हा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांची पहिली सभा अकोट फैल येथे झाली. त्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यात दौरा करून समाजात चैतन्य निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून संपूर्ण जिल्हा त्यांच्या आगमनाने भारावून गेला. त्यामुळे त्यांनी १९८४ ची अकोला लोकसभेची निवडणूक लढवावी असा समाजातून आग्रह सुरू झाला. निवडणुकीसाठी लागणारा निधी आपण ''एक रुपया, एक मत" असा उभा करू असा निर्धार केला गेला.  समाजाच्या या आग्रहावरून त्यांचे    चळवळीतून सक्रिय राजकारणात पदार्पण झाले. त्यासाठी त्यांनी १९८३ मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापन केली. पुढे १९९० च्या दशकात त्यांनी काँग्रेस आणि भाजपला टक्कर देण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून 'अकोला पॅटर्न' सुरू केला. हा त्यांचा पॅटर्न सोशल इंजिनिअरिंग म्हणून जनमानसात दृढ झालेला आहे. 

 अकोला पॅटर्न: वंचितांच्या राजकीय सत्तेचा मार्ग:

ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बमसंच्या माध्यमातून १९८४ मध्ये अकोला लोकसभेची निवडणूक लढवली. या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी १,६५,६६४ इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून जिल्ह्यातील आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले. त्यानंतर १९८५ मध्ये भारिपने विधानसभेची निवडणूक लढविली आणि पक्षाच्या उमेदवारांना दखलपात्र अशी मते मिळाली. पुढे १९८७ मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेड लोकसभेची पोट निवडणूक अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध लढविली आणि १७१००१ एवढी क्रमांक दोनची विक्रमी मते मिळविली. त्यानंतर १९९० साली पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले. तर १९९८ व १९९९ मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभेतून निवडून आले आणि खासदार झाले. त्यामुळे अकोला जिल्ह्यात भारिप बमसंच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक आश्वासक आणि निडर नेतृत्व मिळाले.  

अकोला जिल्ह्यात भारिप बमसंच्या माध्यमातून चांगली राजकीय ताकद उभी झाली होती. त्यामुळे १९९० मध्ये पक्षाने विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आणि अकोट, बोरगाव मंजु, मूर्तिजापूर, अकोला, वाशिम, मंगरूळपीर इत्यादी ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यापैकी मूर्तिजापूर विधानसभेत मखराम पवार निवडून आले. त्यानंतर १९९२ साली भारिप बमसंने अकोला जिल्हा परिषदेतील घराणेशाहीला सुरुंग लावून वंचित घटकातील लोकांना सत्तेत बसविण्याचा निर्धार केला आणि आपले १५ उमेदवार निवडून आणले. तर २० उमेदवार केवळ शंभर दोनशे मतांनी पराभूत झाले. तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ३० उमेदवार निवडून आणले आणि ४८ उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले. त्यामुळे जिल्ह्यात भारिप बमसंच्या रूपाने अकोला पॅटर्न लोकप्रिय व मजबूत झाला. 

या अकोला पॅटर्न मुळे बंजारा समाजाचे मखराम पवार, कोळी समाजाचे डॉ.दशरथ भांडे, बारी समाजाचे रामदास बोडखे, माळी समाजाचे बळीराम सिरस्कार, धनगर समाजाचे हरिदास भदे आमदार व मंत्री झाले. तसेच कोळी समाजाचे डॉ.दशरथ भांडे, माळी समाजाचे बळीराम सिरस्कार, बौद्ध समाजाचे श्रावण इंगळे, तेली समाजाचे बालमुकुंद भिरड, मुस्लिम कासार समाजाच्या साबिया अंजूम, बौद्ध समाजाच्या पुष्पाताई इंगळे, शरद गवई, प्रतिभाताई भोजने, कुणबी समाजाच्या संध्याताई वाघोडे, माळी समाजाच्या संगीताताई अढाऊ, आणि बंजारा समाजाच्या सावित्रीबाई राठोड,  बौद्ध समाजाचे दामोदर जगताप, कुणबी समाजाचे सुनील फाटकर, या सर्व वंचित घटकातील लोकांना मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून सत्ता प्राप्तीची संधी मिळाली.
याशिवाय ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य म्हणून अठरापगड जातीच्या लोकांना सत्तेची संधी मिळाली. 

वंचित बहुजन आघाडी: 
महाराष्ट्रातील समस्त वंचित घटकांना सत्तेची दारे मोठ्या प्रमाणात मिळवून देण्याच्या हेतूने आणि व्यापक भूमिकेतून ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी मार्च, २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडी या राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील  प्रस्थापित व घराणेशाही पक्षांना प्रखर विरोध सुरू केला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवून अनेक जागांवर निर्णायक मते मिळविली. २०१९ नंतर २०२४ च्या निवडणुकीत पक्षातील लोकांच्या फुटीर वृत्तीने आणि काँग्रेसने केलेल्या संविधान बचावच्या नरेटिव्हने भ्रमित झालेल्या समाजातील सुशिक्षित लोकांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली असली तरीही वंचितचा राजकीय दबदबा कायम आहे. 
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय प्रवास हा केवळ सत्तेसाठी नसून, तो 'वंचित' घटकांना राजकीय ताकद देणारा आणि प्रस्थापित नेतृत्वाला सामाजिक न्यायाच्या आधारे आव्हान देणारा एक ध्येयनिष्ठ व तत्त्वनिष्ठ "राजकीय प्रवास" आहे. त्यांचा बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांचा आणि संविधान संरक्षणाचा लढा असाच वृद्धिंगत होत राहो यासाठी त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच मंगल कामना आणि मनःपूर्वक सदिच्छा..!
 
संदर्भ :आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न, प्रथमावृत्ती २०२५, लेखक राजेंद्र पातोडे.
 प्रा. डॉ.एम.आर.इंगळे 
सेवानिवृत्त प्रोफेसर आणि संविधान प्रचारक तथा विभागीय सचिव डाटा अकोला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या