"आजरोजी या राज्यात चाललेय तरी काय.?" असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आलेली असून, "राज्यात कायद्याचे राज्य आहे की लाचखोरांचे".? अशीच सगळीकडे परिस्थिती निर्माण झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेला ज्या एकमेव व्यवस्थेवर विश्वास आहे, ती "न्यायव्यवस्था" देखील भ्रष्टाचाराच्या वाळविणे पोखरली असून ज्यांना साक्षात "देव" म्हणून संबोधल्या जाते ते न्यायाधीश देखील ह्या लाचखोरीच्या जाळ्यात अडकून न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहेत.आता तर ह्या न्याय मंदिराचे पहारेदार असलेले सरकारी वकील सुद्धा लाचखोरीत पुढे सरसावले आहेत.
भारतातील लोकशाही ज्या चार खांबांवर उभी असल्याचे सांगण्यात येते,त्या चारही खांबांना "कीड" लागली असल्याने ही लोकशाही व्यवस्थाच धोक्यात आली आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहांमध्ये स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी प्रश्न उपस्थित करून आपले चांगभले करून घेत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत उघडकीस आल्याने सर्व सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत झालेला असतानाच, देशातील पीडित,शोषित जनतेचे "प्रतिबिंब" असलेला मिडिया शासनकर्त्यांच्या "ताटाखालचे मांजर" होवून डोळे मिटून दूध पीत असल्याचे चित्र आहे.
तर प्रशासन चालविणारी "लालफित शाही" आपल्या स्वार्थासाठी संपूर्ण व्यवस्थाच आपल्या "तालावर नाचवत" असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे सर्व काहीही सुरू असले तरी भारतीय लोकशाही मध्ये न्याय व्यवस्थेवर "प्रचंड विश्वास" ठेवून असलेल्या जनतेचा आता धनंजय निकम, इरफान शेख व काझी यांच्या सारख्या न्यायव्यवस्थेतील लाचखोर व भ्रष्टाचारी न्यायाधीशांमुळे हाही विश्वास डळमळीत व्हायला लागला असून ही लोकशाही येत्या काही वर्षांत जिवंत राहील की नाही.? हा मोठ्ठा प्रश्न आ वासून सामान्य जनतेसमोर उभा राहिलेला आहे. देशांतील लोकशाहीचे काय होईल.? हे मात्र काळाच्या उदरातच लपलेले आहे. ह्याचे उत्तर आज रोजी तरी कुणाकडेच नाही.
काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती निकम यांच्यानंतर गेल्या आठच दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील न्यायमूर्ती काझी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने राज्याच्या न्यायव्यवस्थेचे "धिंडवडे" निघाले असतानाच, आता ह्याच न्याय पालिकेतील सरकारी वकील देखील पुढे सरसावले असून,"हम भी कुछ कम नहीं" हे दाखवित पुढे येत असून आजच छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील शरद बंसी बांगर,वय ४३ वर्षे,पद. सहायक सरकारी वकील,जिल्हा सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर, रा.फ्लॅट नंबर २,आदित्य रेसिडेन्सी,सातारा परिसर,छत्रपती संभाजीनगर यास जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याने राज्यातील न्यायव्यवस्थेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचेवर दिनांक २२/०३/२०२२ रोजी पोलिस स्टेशन जवाहरनगर,छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८१/२०२२ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद असून त्याचा निर्दोष निकाल दिनांक १९/११/२०२४ रोजी लागला.सदर निर्दोष निकालानंतर त्यामध्ये उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी यातील तक्रारदार यांना सरकारी वकील शरद बांगर याने २,००,००० रुपयांची मागणी केली व त्यावेळी १,५०,००० रुपये घेतले. उर्वरीत ५०,००० रुपये तक्रदार यांचे सेवा निवृत्ती नंतर मिळणारे पैसे मिळाल्यानंतर देण्याचे ठरले.त्यानंतर सुद्धा लाचखोर वकील शरद बांगर यांनी त्यांचे सहाय्यक अभिमान करपे यांचे मोबाईल वरून तक्रारदार यांना वारंवार फोन करून राहिलेले ५०,००० रुपये देण्यासाठी तगादा लावला. तक्रारदार यांची लाचखोर सरकारी वकील बंसी बांगरला पैसे देण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी जालना एसीबीकडे ह्याबाबत तक्रार दिली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची सत्यता पडताळणी दि. १७/११/२०२५ रोजी सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वकिलाच्या कार्यालयात पंचासमक्ष केली असता शरद बांगर याने उच्च न्यायालयात अपील न करण्याच्या कामासाठीचे राहिलेले ५०,००० रुपयांमध्ये तक्रारदार यांचे सोबत तडजोड करून ३०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार दि.१७/११/२०२५ रोजी सापळा लावला असता सरकारी वकील बांगरला तक्रारदार याचा संशय आल्याने त्यांचे कार्यालयात आले नाहीत,व त्यांनी त्यांचे मित्र वकील सरतळे यांस तक्रारदार यांचेकडे पाठवून तुमच्यावर एसीबीचा संशय आला आहे असे सांगितले.
त्यानंतर दि.१८/११/२०२५ तक्रारदार यांना परत लाचखोर वकिलाकडे लाचेची रक्कम घेऊन पाठवले असता सरकारी वकील शरद बांगर याने लाच रक्कम घेण्यास टाळाटाळ केली व तुम्ही तुमच्या वकिलांना भेटा असे सांगितले.त्यावरून तक्रारदार यांनी एसीबी कार्यालय जालना येथे येऊन सांगितले की, सरकारी वकील बांगरला "माझा संशय आल्यामुळे ते आता माझ्याकडून लाच रक्कम स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर पुढील कारवाई करावी."
यावरून आरोपी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याने जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सत्र न्यायालयातील लाचखोर सरकारी वकील शरद बंसी बांगरच्या कार्यालयात जाऊन लाच मागणीच्या गुन्ह्यात अटक केली. लाचखोर सरकारी वकिलाची अंगझडती घेतली असता एक रेडमी कंपनीचा आढळून आला. ह्या मोबाईल हॅन्डसेटची तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरु असून आरोपी शरद बांगर विरुद्ध पोलिस ठाणे वेदांतनगर, छत्रपती संभाजीनगर येथे लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई बी.एस.जाधवर ,पोलीस उप-अधीक्षक,एसीबी जालना, तपास अधिकारी कोमल शिंदे पोलीस निरीक्षक, व सापळा पथकातील पोहेकॉ. गजानन घायवट, पोलिस अंमलदार, गणेश चेके, गजानन कांबळे, मनोहर भुतेकर, शिवलिंग खुळे, अमोल चेके एसीबी जालना यांनी केली.

0 टिप्पण्या