अकोला पोलिस दलाला आत्यंतिक "शरमे"ने केवळ चार चौघातच नव्हे तर बंद खोलीत देखील "मान खाली" घालायला लावणारी लाचखोर वरिष्ठ लिपीक ममता संजय पाटील हिला अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे.
राज्यातील पोलिस दलाच्या इतिहासात अगदी पहिल्यांदाच कुणीतरी पोलिस विभागातील कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांत रंगेहाथ पकडण्यात आल्याची अत्यंत दुर्दैवी घटना अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात घडली आहे.ह्या घटनेने संपूर्ण राज्यात अकोला पोलिस दलाची "बदनामी" होत असल्याने अकोल्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात "सुतक" पडल्यासारखे वातावरण आहे.कुणीच कुणाशी काहीच बोलत नसून,खाली माना घालून सगळेच आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दाखवित आहेत.तर इतरत्र विभागाचे किंवा पोलिसी खाक्याला बळी पडलेले काही लोकं ओळखीच्या पोलिस कर्मचाऱ्यांना कालच्या घटनेबद्दल विचारून "जले पे नमक" छिडकत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचारी सहसा कुणाशी बोलण्याचे टाळत आहेत.ही "वास्तविकता" आहे.
अकोल्यातील एक व्यापारी कैलास ओमप्रकाश अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रारदार यांच्या अनुमती शिवाय त्यांच्या वेअर हाउस मधील धान्य विकुन तक्रारदाराची फसवणुक केली होती. त्यावरुन त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयाचा तपास करणारे अधिकारी यांनी आरोपीस मदत केली म्हणुन त्याला जामीन मिळाला अशाप्रकारची भावना झाल्याने सदर व्यापाऱ्याने ह्या त्या तपास अधिका-यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार पोलीस अधिक्षक, कार्यालय, अकोला येथे दिली होती. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक, अकोला यांचे आदेशावरून अपर पोलीस अधिक्षक, अकोला यांनी चौकशी करून अहवाल पोलीस अधिक्षक, कार्यालय, अकोला येथे ह्या पूर्वीच दिलेला आहे.
सदर अहवालावर नोटशिट तयार करून ती पोलिस अधीक्षक ह्यांना सादर करण्यासाठी वरीष्ठ लिपीक ममता संजय पाटील यांनी तक्रारदार कैलास अग्रवाल यांना २० हजार रूपये लाचेची मागणी केली होती.त्यावर अग्रवाल यांनी लाचेची रक्कम त्यांना द्याव्ययाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीची पडताळणी दिनांक ०६.११.२०२५ रोजी केली असता लाचखोर महिला कर्मचारी ममता पाटील यांनी २० हजार रुपयांपैकी ८ हजार रूपये लाचेची रक्कम मागणी केल्याने अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी पोलीस अधिक्षक, कार्यालयात सापळा लावून लाचखोर वरिष्ठ लिपीक ममता संजय पाटील नेमणुक आस्थापना विभाग, ह्या महिलेला पंचांसमक्ष पोलीस अधिक्षक कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले आहे.
लाचखोर लिपीक ममता संजय पाटील या कर्मचारी महिलेने पोलीस खात्यास न शोभणारे वर्तन करून पोलीसांची प्रतिमा मलीन केल्याने तिला अर्चित चांडक, पोलीस अधिक्षक, अकोला यांनी आज कार्यालयीन कामकाज सुरू होताच त्वरीत प्रभावाने "तडकाफडकी निलंबित" केले आहे.
अकोला पोलीस अधिक्षक,कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा पोलिस अधीक्षक, अकोला यांच्या तर्फे आव्हान करण्यात येत आहे की, "पोलीस अधिक्षक कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणीही पैशाची मागणी करीत असेल तर तक्रारदार यांनी सरळ पोलीस अधिक्षक, अकोला यांच्याशी रोज सायंकाळी ०४.०० वा ते ०६.०० वा दरम्यान प्रत्यक्ष संपर्क साधुन माहीती दयावी".

0 टिप्पण्या