परतवाडा येथे नुकत्याच घडलेल्या एका आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या अटकेच्या कारवाईने अमरावती पोलिसांना सर्वत्र अपमानजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.वास्तविक पाहता ही कारवाई अमरावती ग्रामीणच्या पोलिसांची नव्हतीच तर त्या गुन्हेगारां बाबत त्यांना मुंबई क्राइम ब्रांचकडून आरोपी परतवाडा शहरात लपून बसलेले असल्याची माहिती देत त्यांना "डिटेन" करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.इतकेच नव्हे तर नागपूर पोलिसांना देखील असाच "मेसेज" मुंबई पोलिसां कडून पाठविण्यात आल्याने नागपूर व अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई करीत त्याठिकाणी आढळलेल्या १३ व्यक्तींना मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून अटकेची कारवाई केली होती.
त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी "मुंबई क्राइम ब्रँच"चे अधिकारी ह्या आरोपींना ताब्यात घ्यायला आले तेव्हा त्यांना हवे असलेले आरोपी हे नसल्याचे त्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले.त्यामुळे अधिक चौकशी केल्यावर पकडण्यात आलेले इसम हे कोणत्याच स्वरूपाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसल्याची माहिती पुढे आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
मुंबई क्राइम ब्रँचच्या खबऱ्यांनी खोटी म्हणा वा चुकीची टीप देऊन मुंबई पोलिसांना मामा बनविले,परंतु ह्यात मुंबई व नागपूर पोलिसांना जरी काही फरक पडला नसला तरी अमरावती ग्रामीण पोलिसांना मात्र काहीही कारण नसतांना नाहकच नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले आहे.कोणतीही चूक नसताना अमरावती ग्रामीणच्या पोलिसांची मात्र सर्वत्र बदनामी झाली.
अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किरण वानखडे ह्यांना या प्रकरणांत सर्वाधिक त्रास व मनस्ताप झाला आहे,कारण ह्या संयुक्त कारवाई पथकाचे नेतृत्व त्यांनीच केले होते.आजही ते ह्या धक्क्यातून सावरले नसल्याचे समजते.केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील मिडीयाने त्यांनाच धारेवर धरले असून झालेल्या चुकीच्या कारवाईला देखील त्यांनाच जबाबदार धरण्यात आले आहे.
ह्या संपूर्ण घटनाक्रमाबाबत अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद ह्यांनी एक खुलासा मिडिया व नागरिकांसाठी प्रसिद्धीस दिला असून तो जसाच्या तसा वाचकांसाठी याठिकाणी देत आहोत.
दिनांक २/१०/२०२५ रोजी गुन्हे शाखा, मुंबई यांचेकडुन अमरावती ग्रामीण पोलीसांना माहिती मिळाली होती की, कुख्यात आंतरराज्यीय बिष्णोई गैंगशी संबंधीत व मुंबई पोलीसांना हवा असलेला आरोपी हा परतवाडा येथे त्यांचे काही साथीदारासह राहत आहे. त्याला ताब्यात घेण्याबाबत कळविण्यात आले होते. सदरची माहिती नागपुर गुन्हे शाखा यांना सुध्दा वरिष्ठ स्तरावर देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक प्राप्त माहितीच्या आधारे कार्यवाही करीता परतवाडा येथे पोहचले. त्यावेळी नागपुर गुन्हे शाखेचे पथक सुध्दा परतवाडा येथे आले होते. नागपुर शहर व अमरावती ग्रामीण येथील गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी यांनी समन्वय साधत प्राप्त माहितीच्या आधारे शोधत असलेल्या इसमाच्या राहण्याचे ठिकाण निश्चित केले. 'संशयितांचे राहण्याचे ठिकाण हे परतवाडयातील ब्राम्हणसभा सारख्या गजबजलेल्या नागरी वस्तीत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर आरोपी हा कुख्यात गैंगशी संबंधीत असून सध्या त्याचेकडे अग्नीशस्त्र असून ते पोलीस कारवाई दरम्यान विरोध करण्याचा सवईचा आहे व प्रसंगी स्वतःकडील अग्नीशस्त्राकडून फायर सुध्दा करण्याची अत्यंत दाट शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरुन प्राप्त झाली होती. शहरात सर्वत्र दसरा हा सण नागरीक साजरा करीत होते. त्यामुळे सर्वत्र नागरीकांची वर्दळ होती. अशा वेळी अशा प्रकारची कारवाई करणे, नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने ध्यानात ठेवून सर्व सुरक्षिततेचे उपाययोजना करुन नागपुर व अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे पथकाने रात्री १०.३० वा. दरम्यान संशयित राहत असलेल्या ठिकाणी आवश्यक सर्व खबरदारी घेत छापा कार्यवाही केली असता संशयित ज्या घरात राहत होते, त्या ठिकाणी त्यांना दरवाजा उघडण्याबाबत आवाज देवून सुचित केले. परंतु ते घाबरुन जावून अंधाराचा फायदा घेत सैरावैरा पळू लागले. तसेच प्राप्त माहितीतील संशयित आरोपी यांची पार्श्वभुमी बघता संरक्षणार्थ व संशयितांना पकडण्याच्या उद्देशाने पोलीसांनी हवेत ०१ वार्निंग शॉट फायर केला व त्यानंतर त्या ठिकाणी घरात राहणारे सर्व ०८ इसमांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्यांचे इतर साथीदार परतवाडा कश्यप पेट्रोल पंपच्या बाजुला घरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्या ठिकाणीही जावून तेथील ०५ इसमांना सुध्दा ताब्यात घेतले होते. मुंबई गुन्हे शाखेचे पथक सकाळीच परतवाडा येथे दाखल झाले व त्यांनी तसेच स्थानिक पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदर इसमांची बारकाईने सखोल विचारपुस केली असता सदर इसमांचा प्राप्त माहिती प्रमाणे कुठल्याही कुख्यात गैंग सोबत संबंध नसल्याचे तसेच मुंबई गुन्हे शाखा यांना हवा असलेला आरोपी व ताब्यात घेण्यात आलेल्या इसमापैकी एक यांच्यात नाम साधर्म्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. विचारपुस दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व १३ संशयितांचा कुठल्याही गैंगशी संबंध असल्याचे निष्पन्न झालेले नाही. करीता ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व इसमांना सोडण्यात आले आहे. अमरावती ग्रामीण पोलीस नागरीकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या संबंधीत अशा प्रकारच्या कोणत्याही गोपनीय माहितीची तत्काळ सक्रीयतेने पडताळणी करुन कारवाई करण्याची नेहमीच प्राधान्याने दक्षता घेत आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता काहीही आक्षेपार्ह बाब लक्षात येताच पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीसांकडून करण्यात येत आहे.
विशाल आनंद
पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

0 टिप्पण्या