अकोला जिल्ह्यातील अकोट येथील इसाफ नामक बँकेची व ४३५ गोरगरीब महिला ग्राहकांची लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपी कर्मचारी दिपक कांबळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप.क्र. १२७/ २०२५, कलम ३१६ (५),३१८(४),३(५) भान्यासं. यामधील आरोपी दिपक शांताराम कांबळे,वय २६ वर्ष, राहणार कळंबा महाली ता.जि. वाशिम याने अकोट येथील इसाक स्मॉल फायन्सस बँकेच्या ४३५ महिला ग्राहकांची, बँकेच्या इतर दोन कर्मचायांसोबत मिळून बँकेची व ग्राहकांची एकूण १९,८४,८९१ रूपयांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात अकोट येथील बँकेचे एरिया मॅनेजर मनोज खंडारे यांनी या बँकेचे कर्मचारी १). राहुल बाजीप्रभू देशपांडे साईं नगर अमरावती, २). दिपक शांतीराम कांबळे कळंबा मोहाली ता. जि. वाशिम, ३). यश श्रीकृष्ण मनोहर रा. वनोजा पो. शेलूबाजार ता. मंगरुळपिर जि.वाशिम या बँकेच्या तिन्ही कर्मचाऱ्यांविरूध्द लेखी फिर्याद दिली की, वरील तिघेही बँकेमध्ये कार्यरत होते. या तिघांनी बँकत एकूण रूपये १९,८४.८९१ रूपयाचे आर्थिक व्यवहार करून, एकूण बँकेतून लोन घेतलेल्या ४३५ महिला ग्राहकांची व बँकेची फसवणूक केली आहे. बँकेच्या नियमानुसार वरील तिन्ही आरोपींनी महिला बचत गटांना कर्ज देण्याच्या प्रक्रियेत बँकेच्या नियमांचे पालन केले नाही. कर्जासाठी लागणाऱ्या कागदांवर महिला ग्राहकांचे सही व अंगठे येवून काही महिलांना लोन दिले नाही तर, काहींना लोन दिले व सदर महिला यांच्याकडून वसुल केलेले कर्जाचे पैसे बँकेत जमा केले नाहीत. कर्ज खाते बंद केल्याबद्दल काही महिलांकडून पैसे घेतले ती रक्कम सुध्दा बँकेत जमा केली नाही. काही महिलांचे एटीएम बँकेकडून घेवून, एटीएम चे वाटप बचत गटातील ग्राहक महिलांना केले नाही. त्या एटीएमचा वापर आरोपीनी स्वतः केला व एटीएमद्वारे आलेली रक्कम स्वतःकडे ठेवली. काही महिला ग्राहकांनी बँकेकडे तकारी देखील केल्या व यासंबंधी आर्थिक अंकेक्षण अहवालामध्ये १९,८४,८९१ रूपयाचा अपहार झाल्यासंबंधी अहवालामध्ये यासर्व आरोपींचे आर्थिक ऑडीट मध्ये नमूद केले आहे. व अशा प्रकारे या तिघांनी संगणमत करून बँकेची व ४३५ महिला ग्राहकांची १९,८४,८९१ रूपयांनी फसवणूक करून सदर रक्क्म या तिघांनी स्वतः साठी वापरून बँकेची व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. अशा फिर्यादीवरून अकोट शहर पो.स्टे.ला दि. १५.०४.२०२५ रोजी वरील प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली. या प्रकरणात बँकेचा वरील तीन कर्मचाऱ्यांपैकी एक आरोपी दिपक शांतीराम कांबळे याने अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज दाखल केला. या आरोपीकडे बँकेच्या स्टाफ सेल्समॅननी ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम बँकेच्या रजिस्टरमध्ये नोंद घेणे व ती रक्कम बँक काउंटरवर जमा करणे हे काम बॅकेने दिले होते. या अर्जदार/आरोपींची महिला ग्राहकांना कर्ज वाटप व कर्ज घेणे-देणे यासंबंधी पावत्यांवर अर्जदार/आरोपीच्या सहया आहेत. याचे विरोधात फिर्यादीने बँकेच्या वरीष्ठांना अपहार झाल्याबाबत अहवाल सादर केला होता. बँके मार्फत जे ऑडीट घेण्यात आले, त्यामध्ये उपरोक्त अपहार झाल्याचे दिसून आल्याने वरील तिन्ही आरोपींविरूध्द अकोट शहर पो.स्टे.ला बँकेने फिर्याद दिल्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.या आरोपीच्या तपासात चौकशीमध्ये साक्षीदार व बँकेतील महिला ग्राहक ज्यांचे बयाण घेतले असता, त्यामध्ये हा आरोपी व त्याचे दोन साथीदार यांनी ग्राहकांची फसवणूक करून वरील रक्कम स्वतःसाठी वापरली असा उल्लेख आहे. तसेच हा आरोपी व इतर दोन आरोपी म्हणजे या बँकेच्या तिन्ही कर्मचाऱ्यांनी संगणमत करून बँकेची व ग्राहकांची फसवणूक केली असे अंकेक्षण अहवालामध्ये नमूद आहे. आरोपी दिपक कांबळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. त्याने फसवणूक केलेल्या रक्कमेचे काय केले याबाबत त्याची पोलीस कस्टडीमध्ये विचारपूस करणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारा कडून ग्राहकांच्या एटीएम कार्ड बाबत सखोल विचारपूस करणे आवश्यक आहे. तसेच ऑडीट अहवालाप्रमाणे अपहार झालेली रक्कम आरोपी कडून हस्तगत करणे बाकी आहे. अपहार केलेली रक्कम कुठे व कशी खर्च केली तसेच बँकेतील खात्यां बाबत सखोल विचारपूस या आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये होणे आवश्यक आहे. हा लाखो रूपयांचा आर्थिक घोटाळा आहे यामध्ये महिला बचत गटातील मोल मजुरी करणाऱ्या ४३५ महिलांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झालेली आहे. या प्रकरणात तपास पूर्ण झालेला नाही. अकोट शहरचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे व पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते या प्रकरणाचा तपास करित असून, अकोट शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल पोलीस अधिक्षक अकोला यांना अहवाल सादर केल्यावरून पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बँकेच्या या लाखो रूपयांच्या घोटाळयात वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी दिपक कांबळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. अकोट पोलीस आता या फरार आरोपी दिपक कांबळेला कधी अटक करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे.



0 टिप्पण्या