अमरावती शहरात गेल्या चार दिवसांपासून इन्कमटॅक्स विभागाच्या कारवाया सुरू आहेत.विदर्भातील अकोला व अमरावती शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या शोरूमवर एकाच वेळी धाडी टाकून कारवाया करण्यात आल्या होत्या.आयकर विभागाच्या ह्या कारवायांमध्ये अमरावती शहरातील जयस्तंभचौक ह्या गर्दीने गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील "एकता शोरूम"वर चार दिवसां पासून सतत तपास सुरूच आहे.या तपासासाठी नागपूरसह राज्याच्या इतर भागातून आलेले इन्कमटॅक्सचे अधिकारी खाजगी इनोव्हा वाहनांचा वापर करत होते.
एकता ज्वेलर्स मध्ये धाड टाकल्यावर त्याठिकाणी चौकशीची कारवाई सुरूच आहे. त्यासाठी येत असलेले आणि आलेले अधिकारी हे खाजगी इनोव्हा गाड्या वापरत असून,त्यांनी ह्या गाड्या जयस्तंभ चौकातील "नो पार्किंग" झोनमध्ये थेट गाड्या उभ्या केल्या आहेत, त्यांच्या ह्या कुठेही जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. यावेळी अमरावती शहरातील वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके त्या परिसरात अनधिकृत पार्किंग विरोधात कारवाई करीत होत्या. त्यांच्या नजरेस ही नियमभंग करून उभी करण्यात आलेली वाहने पडताच त्यांनी कोणतीही चौकशी न करता सरळ सरळ गाड्यांना चालान करण्याची प्रक्रिया सुरू केली.
एकता ज्वेलर्स मध्ये कार्यवाही करीत असलेल्या इन्कमटॅक्सचे अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाहने आपली असल्याचे सांगत सुरू असलेली वाहनांवरील कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु रीता उईके यांनी कुणाचेही ऐकले नाही.त्या ऐकत नसल्याचे पाहून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला गेला. पण रीता उईके यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता "नियम सर्वांसाठी सारखे" हे ठणकावून सांगत तीन ते चार इनोव्हा गाड्यांचे थेट चालान फाडले.त्यांची ही दबंग कारवाई सुरू असताना बघ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.ह्या गर्दीतूनही रीता उईके यांचेच समर्थन केल्या जात होते.


0 टिप्पण्या