महावितरणचा उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या सापळ्यात अडकला...



   सोलर पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कुडाळ महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले आहे.

   कुडाळ येथील तक्रारदार हे अल्पी पोलराईज्ड टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सोलरचे काम करतात.त्यांनी ग्राहकाकडे सरकारी अनुदानातून बसवलेल्या सोलर पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) विजय जाधव यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने  ५ मे रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली आली. 

      या तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता सत्यता आढळून आल्याने सापळा रचण्यात आला होता. या सापळ्यामध्ये महावितरण कंपनीचा उपकार्यकारी अभियंता विजय जाधव रंगेहाथ लाचेची रक्कम घेत असताना अडकला. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) चे कलम ७ प्रमाणे कुडाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांच्यासह पोलीस हवालदार पालकर,पोलीस हवालदार रेवणकर,अजित खंडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या