एलसीबी म्हणजेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ह्या शाखेचे काम आहे जिल्हाभरात घडलेल्या परंतु स्थानिक पोलिसांना न उलगडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना जेरबंद करणे.मात्र त्या गुन्हेगारांना पकडून गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी ह्याच गुन्हे शाखेतील कर्मचारी त्या गुन्हेगारांच्या गुन्हेगारीला काही रुपयांच्या मोबदल्यात प्रोत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.
बुलढाणा गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका एएसआयकडून वाळू व्यावसायिकाला पैशासाठी त्रास दिला जात होता. त्या तक्रारदाराने या बाबत अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नुकतीच लेखी तक्रार दाखल केली आहे.त्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने अकोला एसीबीच्या पथकाने उपाधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सापळा रचला आणि एलसीबीच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन माळी ह्याला १४,००० रुपयांची लाच रक्कम घेत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक केली.ह्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस उप निरीक्षक गजानन माळीच्या विरुद्ध पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



0 टिप्पण्या