अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनला कार्यरत मात्र गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या लाच मागणीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या पोलिस शिपाई विजय चव्हाण याला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने "अंतरिम अटकपूर्व जामीन" मंजूर करून तात्पुरते संरक्षण दिले आहे.
१९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, कलम ७ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांसाठी पोलिस स्टेशन उरळ, जिल्हा अकोला येथे दि.२० मार्च २९२५ रोजी नोंदविलेल्या गुन्हा क्रमांक ९१/२०२५ मधील अटकेच्या भीतीपोटी अकोल्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.परंतु त्याठिकाणी दि.२८ मार्च २०२५ ला विजय चव्हाण ह्याचा हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज "फेटाळण्यात" आला. त्यानंतर त्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.
दिनांक २/४/२०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून विद्यमान न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके ह्यांनी विजय चव्हाणला अटकेपासून तात्पुरते संरक्षण देत "अंतरिम अटकपूर्व जामीन" मंजूर केला आहे.
ह्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांना दोन आठवड्याच्या आत त्यांचे म्हणणे व अहवाल सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून आरोपी अर्जदार विजय सुखदेव चव्हाण यांस भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा,१९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्ह्यांसाठी पोलिस स्टेशन उरळ, जिल्हा अकोला येथे नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक ९१/२०२५ शी संबंधित गुन्ह्यात अटक केल्यास २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर आणि तितक्याच रकमेचे हमीपत्र घेऊन अंतरिम अटकपूर्व जामिनावर सोडण्यात यावे असे आदेशित करण्यात आले आहे.
विजय चव्हाणला अंतरिम जामिनावर सोडत असतानाच काही अटी व शर्ती लावल्या असून
१) तपासासाठी आवश्यकतेनुसार संबंधित एसीबीच्या कार्यालयात तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहावे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करावे.
२) प्रकरणातील संबंधित असलेल्या कोणत्याही साक्षीदारांना वैयक्तिकरित्या किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रवृत्त करू नये,धमकी देऊ नये किंवा आश्वासन देऊ नये.
यातील कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द केला जाईल.असे अगदी स्पष्टपणे आपल्या आदेशात नमूद केले आहे.ह्या प्रकरणात अटकपूर्व जामिनावरील पुढील सुनावणी दिनांक २२/४/२०२५ ला ठेवण्यात आली असून त्यादिवशी नियमित अटकपूर्व जामीन द्यायचा की नाही हे निश्चित होईल.त्यामुळे सध्यातरी विजय चव्हाणचे "देऊळ पाण्यात" आहे हेही तितकेच खरे.



0 टिप्पण्या