अकोला जिल्ह्यात सर्वत्र सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झालेले असतानाच आता रेल्वेचे प्रवासीही काही फारसे सुरक्षित राहीले नसल्याची अतिशय धक्कादायक व लाजिरवाणी बाब समोर आल्याने अकोलेकर सुन्न झाले आहेत.चिडीमार,चोरटे,लुच्चे बदमाश व टपोरी भाईंच्या भाईगिरीने आधीच त्रस्त असणारे नागरिक अकोला रेल्वेच्या परिसरात देखील सुरक्षित नसल्याने आता रेल्वे पोलिसांच्या देखील "खाबुगिरी"चा "पर्दाफाश" झाला आहे.
पत्नीच्या गळ्यातील "मंगळसूत्र" हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण "चेहरा दगडाने ठेचून" काढल्याचा जीवघेणा प्रकार काल रात्री समोर आला आहे. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरातील ही घटना आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी ह्या मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला.याच दरम्यान चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगडानी ठेचून काढण्याचा "अंगावर शहारे" आणणारा प्रकार काल रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरात समोर आला आहे. सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथके गठीत करून ती तपासकामी रवाना करण्यात आली आहेत.दरम्यान या घटनेने अकोला रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या दुर्दैवी घटनेने अकोला रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित झाला असून हे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात तरी काय.? हा प्रश्न निर्माण होत आहे. रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण होत आहे.
नेमकं काय घडलं...
काल १६ मार्च रोजी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास अकोटवरून अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर दररोज नियमित वेळेवर येणारी "मेमू" ही प्रवासी गाडी आल्यावर त्यातील गावंडे नामक प्रवासी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. या चोरट्यांचा पाठलाग त्या महिलेचे पती हेमंत गावंडे यांनी केला.परंतु काही अंतरापर्यंत पाठलाग करीत असताना चोरट्यांनी परत फिरून त्यांच्यावरच हल्ला चढवला. यादरम्यान गावंडे यांना बेदम मारहाण करण्यात आली,तसेच दगडाने त्यांचा चेहरा देखील ठेचून काढला आहे. गावंडे हे बराच काळपर्यंत घटना स्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.नंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांची प्रकृती चिंताजनक असून अकोला पोलीस व रेल्वे पोलिस या घटनेचा गंभीरतेने तपास करताहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी,अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.अकोला रेल्वे स्थानकावरच असलेल्या पोलिस स्टेशनमधील रेल्वे पोलिस निरीक्षक अर्चना गाढवे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी सदरहू गुन्हा रेल्वे परिसरात घडला असल्याने त्याच्या तपासाला गती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अकोला रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर प्रकार वाढले असून चोरटे व असामाजिक तत्वांच्या गतिविधि वाढल्या असल्याचे ह्या परीसरात खुले आम बोलल्या जात आहे. प्लॅटफॉर्म वर प्रवासी गाड्या असल्या किंवा नसल्या तरी पोलिसांचा बंदोबस्त नसल्यासारखे असतो किंवा हे अधिकारी,कर्मचारी शोधूनही सापडत नाहीत ही फार मोठी शोकांतिका ह्या ठिकाणी आहे.विना परवानगी फेरीवाले,भिकाऱ्यांचे थव्यांचे थवे प्रवासी गाड्यांमध्ये घुसून आपल्या दादागिरीने प्रवाशांना अगदी त्रस्त करून सोडत असून, प्रवासी मात्र मेटाकुटीस आले आहेत. ह्या अवैध प्रकार करणाऱ्यां सोबतच रेल्वेत फिरणारे "हिजडे" यांच्याशीही पोलिसांचे साटेलोटे असल्याने तिकीट काढून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जीवघेणे हल्ले होवून त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे आणि ह्या मुळेच रेल्वे पोलिसांच्या हप्तेखोरीने प्रवाशांचा जीव धोक्यात आला असल्याची नागरिकांची भावना आहे.







0 टिप्पण्या