काय,वकील साहेब तुम्हीही.? काळ्या कोटाची अब्रु गमावून काय कमावले..?



    आजच्या ह्या स्वार्थी व मतलबी युगात देशातील सर्वसामान्य जनतेचा "लोकशाही" आणि तिचे भक्कम आधारस्तंभ असलेल्या "कथित स्तंभां"वरून विश्वास उडाला असून फक्त "न्यायव्यवस्थे"वरच काहीतरी प्रमाणात विश्वास आहे.भारतातील लोकशाही आजही  टिकवून असलेल्या ह्या न्यायव्यवस्थेला देखील  "भ्रष्टाचाराची कीड" लागली असून "सिस्टीम"च्या ह्या भक्कम असलेल्या स्तंभालाही पोखरने सुरू केलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी विश्वास ठेवायचा तो कुणावर.? असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.


    कधी नव्हे ते आता इतक्यात विदर्भाच्या मातीत "कर्तव्याशी बेइमानी" करणारांचे पिक यायला सुरुवात झाली असून हे प्रमाण  दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.समाजात, सिस्टिममध्ये काम करीत असतानाच पैसा व मानसन्मान असे सर्वकाही मिळत असताना देखील काही लोकं "भ्रष्टाचाराच्या गटार गंगे"त लोळण घेण्यासाठी आतुरलेले असून प्रसंगी मानसन्मान देखील "खुंटीला टांगून" ठेवायला असेच काही वकील मागे पुढे पाहत नाहीत. अशीच भीषण अवस्था न्यायव्यवस्थेची देखील झाली आहे.ज्यांच्यावर समाजातील रंजल्या गांजलेल्या, दुबळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी दिलेली आहे तेच वकील जेव्हा असे भ्रष्टाचाराच्या "गटारात लोळण" घेतांना दिसतात तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्याशिवाय राहत नाहीत.

   काल बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अशाच एका वकिलाला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी न्यायदानाच्या प्रक्रियेत आपली भूमिका योग्यरीतीने पार पाडण्या साठी थोडी थोडकी नव्हे तर चक्क एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने वकिल वर्गाची चांगलीच "अब्रु घालवण्यात" आली आहे.

    बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईल,अशा पद्धतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सहायक सरकारी वकील  जनार्धन मनोहर बोदडे,वय ६१ वर्षे, यांस वाशिम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल म्हणजेच शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी लाचेची रक्कम घेत असताना रंगेहाथ अटक केली आणि त्यामुळे मेहकर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


    याप्रकरणी मेहकर येथील एका ५० वर्षीय तक्रारकर्त्याने वाशिम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात शिक्षा होईल,अशा प्रकारे बाजू मांडण्यासाठी मेहकर न्यायालयातील सहायक सरकारी वकील जनार्धन मनोहर बोदडे यांने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.

    लाचेची रक्कम द्यायची मनापासून इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी वाशिम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या  पडताळणी दरम्यान बोदडेने पंचासमक्ष २ लाख ५० हजार रुपये मागितले होते. तक्रारीची सत्यता पटल्यामुळे वाशिम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि त्यात पंचासमक्ष एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना मेहकर न्यायालय परिसरात सहायक सरकारी वकील जनार्धन मनोहर बोदडे पुरते अडकले.वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वकील बोदडेला ताब्यात घेतले असून लाचखोरीच्या याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक बालाजी तीप्पलवाड, पोलिस हवालदार विनोद मार्कंडे, आसिफ शेख, योगेश खोटे, शिपाई रवींद्र घरत आणि मिलिंद चन्नकेशला व त्यांच्या पथकातील  सदस्यानी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या