"ऑन ड्युटी झोपा" काढणाऱ्या पोलिसांना एस.पी.नी "रंगेहाथ" पकडले...



   अकोला शहरातील लाखो लोकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या कामी विविध पोलिस ठाण्यात तैनात करण्यात आलेले पोलिस अंमलदार नेमकी कशी ड्युटी करतात आणि किती सजगतेने आपले कर्तव्य पूर्ण करतात हे पाहण्यासाठी अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी रविवार दि.२३.०२.२०२५ रोजी मध्यरात्री ३:३० ते ४:०० वाजताच्या दरम्यान अगदी अचानकपणे शहरातील रामदासपेठ व अकोट फाइल पोलिस स्टेशनला भेट दिली असता त्यांना त्याठिकाणी अनपेक्षित व अत्यंत चीड आणणारे दृश्य नजरेस पडले.ज्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरवशावर परिसरातील लाखाच्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे ते पोलिसच चक्क "झोपा काढत" असलेले दिसून आले आहे.


रामदासपेठ पोलिस ठाण्यात भेट दिली असता त्याठिकाणी 

१) पोहवा/२०४९, अनिल भातखडे, नेमणुक पोस्टे. रामदास पेठ हे कर्तव्यावर असतांना झोपलेले आढळून आले.

 २)चालक २५५०,विजय गावंडे, नेमणुक पोस्टे. रामदास पेठ हे कर्तव्यावर असतांना गाडीमध्ये झोपलेले आढळुन आले.

३)मपोहवा/२२१७, माधुरी लाहोड, नेमणुक पोस्टे. रामदास पेठ ह्या कर्तव्यावर असतांना पोलीस स्टेशनमधील बाजुच्या रुममध्ये झोपलेल्या आढळुन आल्यात.

४)मपोशि/२२७२, कावेरी ढाकणे, नेमणुक पोस्टे. रामदास पेठ ह्या कर्तव्यावर असतांना पोलीस स्टेशनमधील बाजुच्या रुममध्ये झोपलेल्या आढळुन आल्यात.


अकोट फाइल पोलिस स्टेशनला भेट दिली असता त्याठिकाणी

५)चालक ८३७, भाऊराव धुरंधर, नेमणुक पोस्टे. अकोट फाईल, हे कर्तव्यावर असतांना चेंबरमध्ये झोपलेले आढळुन आले.

६)पोहवा/२३७३, प्रविण धरमकर, नेमणुक पोस्टे.अकोट फाईल हे कर्तव्यावर असतांना स्टेशन डायरीवर झोपलेले आढळुन आले.

७)मपोहवा/२१२७, हर्षा बाटे,  नेमणुक पोस्टे.अकोट फाईल,
ह्या कर्तव्यावर वायरलेस ड्युटीवर असतांना पोलीस स्टेशनमधील बाजुच्या रुममध्ये झोपलेल्या आढळुन आल्यात.

      अकोला शहरातील दोन महत्त्वाच्या व अत्यंत संवेदनशील असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये रात्रीच्या वेळी चालत असलेला हा मनाला वेदना देणारा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पायाखालची प्रत्यक्षात जमीनच सरकली आहे.आपल्या अधीनस्थ असलेले जबाबदार कर्मचारी कोणत्या पद्धतीने आपल्या कर्तव्याचे पालन करतात याचे साक्षात दर्शनच त्यांना झाले आहे.गुन्हेगारांवर वचक निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना शांततापूर्वक जीवन जगण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते जर अशाप्रकारे ऑन ड्युटी झोपा काढत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? हा प्रश्न निर्माण होत आहे.

   जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी हा प्रकार उघडकीस आल्यावर जिल्ह्या तील सर्वच पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी रात्रीच्या गस्ती वाढवून आपापल्या पोलीस स्टेशन मधील डयुटी अंमलदार यांची नियमित तपासणी करुन त्याबाबत सतर्कता ठेवण्यात यावी,असे आदेश काढले आहेत.

    तर दिनांक २३/२/२०२५ च्या रात्री पोलिस अधीक्षक यांना अकोल्या तील रामदासपेठ व अकोट फाइल पोलिस स्टेशनमध्ये "ऑन ड्युटी झोपलेले" आढळून आलेल्या सातही पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या "कसुरी"चे अनुषंगाने त्यांनी केलेल्या कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजी पणा व गैरवर्तन दिसुन आल्याने पोलिस अधीक्षकांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मुंबई पोलीस (शिक्षा आणि अपीले) नियम १९५६ मधील नियम नियम ३ (२) (४) अन्वये प्रत्येकी २००० रुपये आर्थिक दंडाची शिक्षा देण्यात आली असून संबंधितांना  दि.२४/०२/२०२५ ला हे आदेश बजावण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या