अकोला जिल्हा बँकेचे संचालक हिदायत पटेल यांनी गेल्याच आठवड्यात राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी "कुणाला" उमेदवारी देवून संचालक पदी बसविणार हे गेले काही दिवस तरी "गुलदस्त्या"तच होते.मात्र आज तो गुलदस्ता उघडल्या गेला असून त्यातून "घराणेशाही"च्या वारसाचे नाव पुढे करण्यात आले आहे.
अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आजन्म अध्यक्ष राहिलेले डॉ.अण्णासाहेब कोरपे ह्यांचे नातू व विद्यमान अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे ह्यांचे चिरंजीव जयराज संतोष कोरपे ह्यांचा सहकार गटातील अधिकृत प्रवेश जिल्हा बँकेचे संचालक म्हणून "अविरोध" निवडून आणून करण्यात आला आहे.आज झालेल्या निवडणुकीत "जयराज संतोष कोरपे" ह्यांच्या विरोधात कुणाचाही अर्ज नसल्याने त्यांना अधिकृतरित्या "अविरोध संचालक" म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
जयराज संतोष कोरपे ह्यांची जिल्हा बँकेचे संचालक पदावर अविरोध निवड करून जिल्हा बँकेचे "भावी अध्यक्ष" म्हणून अधिकृतपणे "राज्याभिषेक" करीत सहकार गटातील "घराणेशाहीवर शिक्कामोर्तब" करण्यात आले आहे.
त्यांच्या उमेदवारी बाबत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गुप्तता पाळली जात होती, त्याची कल्पना सहकार क्षेत्रातील बऱ्याच दिग्गजांना सुद्धा देण्यात आलेली नव्हती. सहकार क्षेत्रातील अनेक लहान मोठ्यांना ह्या बाबत विचारणा केली असता त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगितले सांगत चक्क कानावर हात ठेवले होते,तर काहींनी राजीनामा व रिक्त पदाची निवडणूक ह्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चक्क नकार दिलेला आहे. ह्या सर्व बाबींवरून एकच निष्कर्ष निघत होता,तो म्हणजे आज १० तारखेला निवडणूक होणारच नव्हती तर ती फक्त "निवड"च होणार होती.एकच उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणुकच "अविरोध" केल्या जाणार असल्याचे अगदी स्पष्ट चित्र दिसत होते.
आज ठरल्याप्रमाणे निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात केल्यावर त्यांच्याकडे एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता आणि दुसऱ्या कुणाचाही अर्ज न आल्याने त्यांना सरते शेवटी अविरोध घोषित करण्यात आले आहे.





0 टिप्पण्या