अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईत फार मोठा भ्रष्टाचार झाला असून, तेल्हारा तालुक्यातील दोन सज्ज्यातील काही गावात चक्क शेती नसलेल्या व्यक्तींना अनुदान अदा केल्याचे करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.चौकशी अहवालात अनेक गंमतीशिर,गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.तेल्हारा तालुक्यातील दोषी असलेल्या भारत ढोरे व नंदू मांडवे नामक ह्या दोन तलाठ्यांना एका आदेशाद्वारे निलंबित करण्यात आले आहे.
तेल्हारा तालुक्यातील दोन तलाठ्यांनी शासनाला थोडाथोडा नव्हे तर २६ लाख ४७ हजारांचा चुना लावला आहे. याच अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी अनुदानास पात्र असलेल्या आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना आस्मानी व सुलतानी संकटात मदतीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत तर दुसरीकडे मात्र शेतीच नसलेल्या लोकांना न मागता भरघोस बिदागी वाटण्यात आली आहे.
तेल्हारा तालुक्यात खंडाळा, आडसूळ व उमरी परिसरात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.त्या नुकसानीचे महसूल, कृषी व जि.प.या तिन्ही यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. मात्र ह्यात झालेल्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याने तहसील कार्यालयाच्या आदेशाने चौकशी करण्यात आली असता, खंडाळा येथील तलाठी भारत ढोरे, तलाठी नंदू गोविंद मांडवे (आडसूळ ) यांनी अनुदान वितरणात अनियमितता केल्याचा आरोप सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात करण्यात आला. ही रक्कम त्या दोन तलाठ्याकडून वसूल करून त्यांच्यावर विभागीय चौकशी करून कारवाईची शिफारसही करण्यात आली होती.
तहसीलदार,नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या सदरहू चौकशीचा अहवाल अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आला होता.
नियमानुसार नुकसानीचे संयुक्त पंचनामे तलाठी,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी करायला पाहिजे होते मात्र खंडाळा येथील पंचनामे कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना विश्वासात न घेता तलाठी भारत ढोरे यांनी एकतर्फीच केले होते. पंचनामा यादी ग्रा.पं.च्या सूचना फलकावर प्रसिद्ध केलीच नाही.संबंधित तलाठी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून १२ लाख सहा हजार ७०० रुपयांचा अपहार करण्यात आला असे अहवालात नमूद आहे.
खंडाळा,बोरव्हा,चंदनपूर येथे शेत जमीन नसलेल्यां व्यक्तींना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान देण्यात आले. या अहवालात २४ व्यक्तींच्या नावाची नोंद घेण्यात आली असून, यात बैंक खाते, जमा झालेली रक्कम व त्यांच्या या साझ्यात शेत जमीन नाही, असाही उल्लेख केला आहे.ह्या २४ व्यक्तींच्या नावे ४५ हजार ते ५४ हजार अशी रक्कम टाकण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या नावाने ०.७९ हे आर जामीन आहे त्यांना २ हे.आर एवढ्या रक्कमचे अनुदान देण्यात आले आहे. या व्यक्तीला एकूण ५९, ४०० रुपये शिल्लक देण्यात आल्याचे ह्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
आडसूळ येथील ३८.४३ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र खरडून गेल्याचा चुकीचा अहवाल सादर केल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने १४ लाख ४१,१२५ रुपयांचे नुकसान झाले. अनुदान वाटपाच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही अशा शेतकऱ्यांना लाभ दिला असल्याचे दिसून येत आहे. समन्वय न ठेवता संयुक्त पंचनामे सादर केल्या गेले नाहीत,असेही ह्या त्रिस्तरीय अहवालात स्पष्टपणे नमूद केल्या गेले आहे.



0 टिप्पण्या