वकिली व्यवसाय करीत असतानाच पोलीस पाटील या पदावर काम केल्यामुळे वकिलांची सनद बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्यावतीने रद्द करण्याचा निर्णय दिला गेला असल्याचा प्रकार नुकताच घडला असल्याने राज्यातील वकील वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वकिलीचा व्यवसाय करीत असतानाच स्वतःच्या गावाचा पोलीस पाटील म्हणून काम केल्यामुळे विदर्भातील एका वकिलाची सनद बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्यावतीने रद्द करण्याचा निर्णय दिला गेला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबारे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष याप्रकरणी सुनावणी झाली आहे. उच्च न्यायालयाने वकिली व्यवसाय करीत असताना इतर व्यवसाय करण्याबाबत मनाई करणारी काही नियमावली वा आचारसंहिता आहे काय ? याबाबत बार काउंसिलला उत्तर मागितले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील अॅड.अशोक भीमराव शेळके हे वकिली व्यवसाय करतात. अॅड.शेळके यांनी २०१२ मध्ये बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाकडून सनद घेतली असून,त्यांनी एम.ए., एल.एल.बी., बी.एड. हे शिक्षण घेतलेले आहे. ते त्यांच्या गावातील एकमात्र वकिलीचा व्यवसाय करणारे वकील आहेत. हा वकिलीचा व्यवसाय करीत असताना दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या चिंचोली ह्या गावातील पोलीस पाटील हे पद देखील भूषविले आहे. तसेच स्वत:च्या मेहनतीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या शासकीय पदासाठी त्यांची निवड देखील झालेली आहे. परंतु त्यांच्या ह्या प्रगतीमुळे त्यांचा हेवा करणाऱ्या काही वकिलांनी त्यांनी वकील असताना पोलीस पाटील या पदावर काम केले व व्यावसायिक आचार संहितेचा म्हणा वा बार कौन्सिलने घालून दिलेल्या नियमांचा भंग केला केला, अशी तक्रार केली. आणि या तक्रारीच्या आधारावर बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा या वकिली व्यवसाय करणाऱ्या वकिलांच्या राज्यस्तरीय संघटनेने त्यांना निलंबित केले तसेच वकिली व्यवसाय करण्यापासून मज्जाव केला असल्याने अॅड. शेळके यांनी बार काउंसिलच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कॉन्सिलच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.



0 टिप्पण्या