मराठा समाजाबद्दल दीड ते दोन वर्षांआधी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. आज सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात येवून पोलीसांच्या समोर शरणागती पत्करल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पोलिस दलात स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर असतांना किरणकुमार बकाले याने संभाषणात मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याची त्यावेळी ऑडिओ क्लिप देखील प्रचंड व्हायरल झाली होती. आणि यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक निर्माण झाला होता. यावेळी मराठा समाजाच्या लोकांनी जिल्हा पेालीस अधिक्षक कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी तत्कालिन पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना बकालेवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकालेविरोधात गुन्हा देखील दाखल करून निलंबित करण्यात आले होते,तेव्हापासून सदरहू पीआय बकाले फरार झाला होता.
मात्र गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या बकालेला ताबडतोब अटक करावी अशी मागणी जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने वारंवार करण्यात येत होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करून वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती.याबाबत राज्याच्या विधानसभेत देखील बकाले याला अटक करण्याच्या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार बकालेला अटक करण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी पोलीसांना सुचना देण्यात येत होत्या. परंतु गेल्या दीड वर्षांपासून आरोपी किरणकुमार बकाले हे फरारच होता.
गेल्या दीड वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाने हा प्रश्न सतत तापलेलाच ठेवला होता. बकाले याने स्थानिक न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने सामाजिक गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. तर दुसरीकडे मराठा समाज व शासनाचा वाढता दबाव पाहता पोलीसांनी बकालेची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईसाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यामुळे सगळीकडून आपल्याला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात आल्यावर अखेर बकालेने आज सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून शरणागती पत्करली. निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकालेला दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





0 टिप्पण्या