राज्यात दररोज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया सुरूच असून त्यात लाच मागणारे रंगेहाथ पकडल्या जाण्याच्या घटना घडत असतात आणि ही आता काही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही.परंतु काल विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरांत याच्या विपरीत घटना घडली असून चक्क लाच देणाऱ्यालाच ( रिव्हर्स ट्रॅप ) जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळ्यात अडकवले आहे.त्यामुळे केवळ लाच घेणे हाच नाही तर लाच देणे हा देखील गुन्हा असल्याचे लोकांना या घटनेवरून माहीत झाले आहे.
काल खामगाव येथील वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात मलकापूर येथील व्यापारी कर विभागाच्या सहायक आयुक्ताला चक्क तीन लाख रुपयांची लाच देत असतांना एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे.प्रवीण मदनलाल अग्रवाल असे त्या व्यापाऱ्यांचे नाव असून मलकापूर येथील बजरंग इंडस्ट्रीज हे त्याच्या कंपनीचे नाव आहे.घडलेल्या या प्रकाराने खामगाव व मलकापूर शहरातील व्यापारीवर्गात दिवसभर या एकाच विषयावर चर्चा सुरू होती.
सदरहू व्यापाऱ्याच्या दाल मिल असलेल्या कंपनीचा सण २०१७/१८ या काळातील जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा कर थकीत होता,याबाबत जीएसटी कार्यालयाने वारंवार नोटीसेस देखील दिलेल्या होत्या. यासाठी कर विभागाने डिसेंम्बर महिन्यात या थकीत रकमेच्या वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची नोटीस दिली होती.त्यावर या व्यापाऱ्याने कर कमी करून सगळे काही व्यवस्थित करण्यासाठी जीएस्टीच्या सहायक आयुक्तालाच चक्क तीन लाख रुपये लाच देण्याचे आमिष दिले.
मात्र सहाय्यक आयुक्ताने व्यापाऱ्याला धडा शिकविण्यासाठी जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली, त्यावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून सत्यता आढळून आल्याने काल सापळा कारवाई आयोजित करून व्यापारी प्रवीण मदनलाल अग्रवाल याला पंचांसमक्ष तीन लाख रुपये लाच देत असतांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनला शासकीय अधिकाऱ्याला लाच देण्या बाबत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जालना एसीबीचे उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वात पो.हे.कॉ.गजानन घायवाट, शिवाजी जमधडे, पो.कॉ.गणेश भुजाडे व चेके यांनी यशस्वीपणे पार पाडली.



0 टिप्पण्या