हे कलियुग आहे आणि ह्या युगात कोण कसा वागेल किंवा कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. ज्यांच्यावर समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर "प्रतिबंध" लावून "सामाजिक नैतिकता" जोपासण्याची जबाबदारी कायद्याने देण्यात आलेली आहे.तेच पोलीस कर्मचारी जर स्वतःच "अनैतिक" कामे करून संपूर्ण पोलीस विभागाला समाजात "बदनाम" करीत असतील तर त्या गुन्ह्याला कायदाच काय तर कुणीच "माफ" करणार नाही.
अकोला जिल्ह्यातील अकोट या शहराची प्रशासनाच्या लेखी आणि शासनस्तरावर केवळ संवेदनशीलच नव्हे तर "अतिसंवेदनशील" म्हणून नोंद आहे,आणि म्हणूनच गेल्या वर्ष दीड वर्षांपासून या शहरात "डीवायएसपी" या पदावर गृहखात्याकडून "आयपीएस" कॅडरच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. याआधी अकोटला रितू खोकर ह्या महिला आयपीएस अधिकारी असतांना महिलांवरील होणाऱ्या गुन्ह्यात बऱ्याच अंशी घट झाली होती हे सत्य नाकारून चालणार नाही.नुकतीच त्यांची येथुन बदली झाली असून त्यांच्या जागी अनमोल मित्तल ह्या आयपीएस अधिकाऱ्यांची गृहखात्याने नियुक्ती केली आहे.
काल सकाळी अनमोल मित्तल या आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या "पदाचा प्रभार" घेतल्यावर काही तासांतच त्यांच्याच अखत्यारित असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने त्यांना चांगलीच "वेलकम" सलामी देऊन "सॅल्युट ठोकला" असून तो ह्या पोलीस अधिकाऱ्यांना चांगलाच आठवणीत राहणार आहे.ह्या पोलीस शिपायाच्या विरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला "साधा सुधा" नव्हे तर चक्क "बलात्कारा"चा गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्या दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्याचे काम ह्याच आयपीएस अधिकाऱ्यां कार्यकक्षेत आले आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
अकोट शहर हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे, याठिकाणी काम करीत असतांना परिसरात घडणाऱ्या अत्यंत बारीकसारीक गोष्टींवर "डोळ्यात तेल" घालून लक्ष ठेवावे लागते.थोडे जरी दुर्लक्ष झाले तर आठ दिवसांच्या "संचारबंदी"ची गरज पडतेच आणि मग इतर कुणाच्या नाही पण पोलिसांच्या नशिबी झोप तर सोडा दोन वेळचे जेवणही येत नाही. यासाठी पोलीस विभाग हा इतर विभागांपेक्षा जास्त "जागरूक" असतो.मात्र असे असल्यावरही काही "कामचोर",व नैतिक अधःपतन झालेले कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या "डोक्याला" नसता "ताप" देण्याचे उपद्व्याप करून आपण ज्या विभागात काम करतो त्या विभागाची "चौफेर" बदनामी करण्याचे "काम" करतात.
सदरहू पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल झाल्यावर फरार झाला असून पोलीस विभाग त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी अकोट शहर पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अकोट शहर पोलीस स्टेशनला चौकशीसाठी ठाण मांडून बसलेआहेत.




0 टिप्पण्या