पोलिसाद्वारे पीडित महिलेची जीवन मृत्यूशी झुंज,तीन दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये..?



 
   अकोला जिल्हा पोलीस दलाला "काळिमा फासणाऱ्या" पोलीस शिपायाद्वारे बलात्कारित महिलेने अकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीच कारवाई झालेली नसतांना याप्रकरणांतील फिर्यादी महिलेला "विष संसर्ग" झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.तीन चार दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास सदरहू महिलेच्या पतीने तिला विषबाधा झाल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करीत असताना तिला खाण्याच्या पदार्थात काहीतरी  पडल्यामुळे विषबाधा झाल्याचे सांगितले वरून डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असून आजरोजी तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.


    तीन दिवसांपूर्वी अकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार झाल्याने हा "अपघात आहे की घातपात" किंवा आत्महत्येचा तर  प्रयत्न नाही ना ? याविषयी अकोट शहर पोलिसांनी तातडीने तपास करून पुढील कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र ही "विषबाधेची" खळबळजनक घटना घडल्यावरही पोलीस तपासला कोणतीच गती आलेली नाही ही त्या महिलेच्या बाबतीत दुर्दैवाची बाब आहे.     

    सुदैवाने त्या महिलेचा या दुर्दैवी प्रकारातून जीव वाचला असून आजरोजी ती अकोला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

    अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी ) शिवम दुबे नामक कर्मचाऱ्याने पोलीस दलात कार्यरत सहकाऱ्याच्याच पत्नीला फेसबुक, व्हाट्सअप्पच्या माध्यमातून "प्रेमाच्या जाळ्या"त ओढून तिच्यावर गेल्या वर्ष दीड वर्षांपासून शारीरिक अत्याचार करून "ब्लॅकमेल" केल्याची तक्रार सदरहू महिलेने गेल्या काही दिवसांपूर्वी अकोट पोलिसांत दिली होती.या तक्रारींवर अकोट शहर पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र तीन दिवसांपासून अद्यापही आरोपी "मोकाटच" आहे

   बलात्कारित महिलेने सामाजिक भीती व दडपणाखाली येऊन विषारी द्रव्य प्राशन करून जिवन संपविण्याचा प्रयत्न तर केला नाही ना वा कुणी तिच्यावर "विषप्रयोग" करून "घात" करण्याचा तर प्रयत्न केला नाही ना याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.त्या महिलेचे मानसिक समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असून पोलिसांनी त्यादृष्टीने फिर्यादीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
    
    मात्र गुन्हा दाखल झाल्यावरही आज तिसरा दिवस उजाडला असून देखील या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नसल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेत नाराजी व्यक्त केल्या जात असून केवळ तो कर्मचारी पोलीस विभागातील असल्यामुळे तर त्याला "मोकळीक" दिल्या जात नाही ना..? एका महिलेचे "जीवन उद्ध्वस्त" करणाऱ्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला त्वरित अटक करून "बडतर्फ" करण्यात यावे तसेच त्याला या प्रकरणांत मदत करणारा कुणी सहकारी असेल तर त्या सहकारयाला देखील शोधून सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या