अमरावतीच्या खासदार,आमदारांनी लाज सोडली पण सुशिक्षित लोकांचे काय ?...



     गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहरांत प्रदीप मिश्रा नावाच्या शिवकथा सांगणाऱ्या एका तथाकथित महाराजाच्या कार्यक्रमाचे बॅनर  संपूर्ण अमरावती,बडनेरा शहरांत लागले असून त्यावर ज्यांनी आपले उभे आयुष्य समाजातील अंधश्रद्धा,रूढी व परंपरांची जोखडे लोकांनी तोडून टाकावी यासाठी झिजविले त्याच थोर संतांच्या प्रतिमा समाजात अंधश्रद्धा पसरविण्यासाठी वापरण्यात येत असल्याने काही डोळस नागरिक चीड व्यक्त करीत आहेत.

      निवडणुका जवळ आल्या की काही पक्षांचे आणि राजकारणी लोकांचे हिंदुत्व उसळ्या मारत सर्वत्र व्यक्त होत राहते.समाजातील लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन मग ते ज्या धर्माला किंवा साधू संतांना पुज्य समजून त्यांच्या सांगण्याप्रमाणे जगण्या वागण्याचे ठरवतात त्यांचेच कार्यक्रमाचे आयोजन करून, ह्यातूनच मतलबी राजकारणी आपली पोळी शेकून घेतात.

    गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहरांत अशाच एका कथित महाराजांचे प्रवचनाचा, सामान्य जनतेच्या मनात अंधश्रद्धा पसरवून, त्यांना देवाधर्माच्या नादी लावून आपले इप्सित साध्य करण्याच्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

    त्यांच्या ह्याच लोकांना मूर्ख बनविण्याच्या कार्यक्रमासाठी ज्या गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले,त्यांना देवाधर्माच्या नावावर चालणाऱ्या ढोंगी बाबा,महाराज यांच्या फसव्या मायाजालातून मुक्त करण्याचे काम केले,आज त्याच अमरावती जिल्ह्यातील महान संतांच्या फोटोंचा वापर करून जिल्ह्यातील जनतेला समाजात तीव्रतेने अंधश्रद्धा पसरविणार्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.ही अत्यंत चीड निर्माण करणारी बाब असून आमदार व खासदार असलेले राणा दाम्पत्याने कोणतीही नैतिकता न बाळगता जाहीररीत्या ह्या थोर संतांचा अपमान करण्याचे धारिष्ट्य केले आहे.

    आज रोजी अमरावती शहरातील लेखक, प्राध्यापक,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते,पत्रकार इतकेच काय तर ज्या गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या नावावर असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू, कुलपती असलेले राज्याचे राज्यपाल यांनी साधा निषेध सुद्धा नोंदवू नये ही स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या लोकांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे.

      राणा दाम्पत्याने तर सगळीच लाज सोडून ते पार निर्लज्ज झाले असल्याचे त्यांच्या ह्या निर्बुद्ध कृतीवरून दिसूनच येत आहे.पण इतर डोळस राजकारण्यांचे काय ? की तेही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक डोळे मिटून बसले आहेत ? असचं म्हणायचं काय मगं ? डोळस संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय तरी काय ? एक लोटा जल, सब समस्या का हल. असं जर असेल तर अमरावती शहरातील राजकारण्यांनी,देश चंद्रावर पोहोचला म्हणून गर्वाने छाती फुगवून सांगणार्यांनी अगदी बिनधास्तपणे समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणाऱ्या प्रदीप मिश्रासोबत आपल्या घरात पिंडेवर जलाभिषेक करून पुढील आमदार, खासदारकी आणि मंत्रिपदं मिळवावी परंतु  भोळ्या भाबड्या जनतेला आपल्या बॅनरवर गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे फोटो लावून फसवेगिरी करू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या