अल्पवयीन सावत्र मुलीला शितपेयामधे दारु पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ६५,००० रु दंडासह मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी ठोठावली आहे.
अकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या अपराध क्र. ५०/२०२२ कलम ३६३,३५४,३७६ (२) (एफ), ५०६ सहकलम ५ (एन) (पी), ६ पोक्सो कायदा मधील आरोपी विजय छगन दवंडे, वय ४१ वर्ष,रा. अकोट ता.अकोट जिल्हा अकोला याने १६ (सोळा) वर्षीय सावत्र अल्पवयीन मुलीला शितपेयामध्ये दारु पाजुन बलात्कार केल्याचा प्रकरणात भादवीचे कलम ३५४ प्रमाणे ३ वर्ष कठोर कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंड, दंड न भल्यास १ महिना अतिरीक्त सश्रम कारावासची शिक्षा, तसेच भादवीचे कलम ५०६ प्रमाणे १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भल्यास १५ दिवसाची अतिरीक्त सश्रम कारावासची शिक्षा, तसेच भादविचे कलम ३७६ (२) (एफ) व ३७६ (३) तसेच पोक्सो कायदयाचे कलम ५ (एन) पी.यु.एस ६, ५ (पी) पी.यु.एस ६ प्रमाणे आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ५०,०००/- रूपये दंडासह ठोठावली आहे .दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल असे आदेश अकोट सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व विशेष न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी आज दिले आहेत.आदेशामध्ये पुढे असेही नमूद केले आहे की तसेच दंडाची रक्कम एकुण ६५ हजार रुपये आरोपीने भरल्यास पिडीतेला ती नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, सदर प्रकरणात फिर्यादी विजय छगन दवंडे याने अकोट शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की, त्याची अल्पवयीन मुलगी घरी कोणालाही न सांगता घरुन निघुन गेली व तीला कोणी अज्ञात इसमाने पळवुन नेले असावे अशा जबानी रिपोर्टवरुन कलम ३६३ भादवी अन्वये गुन्हा नोंद करुन तपासावर असतांना यातील पिडीता ही तिच्या आईसह पोलीस स्टेशनला येऊन तिचा जवाब नोंदविला असता तिने तिचे जबाबात फिर्यादी हा तिचा सावत्र बाप असुन त्याने तिचा अकोट येथे राहते घरी वारंवार विनयभंग केला आहे,तसेच तिचेवर अकोला येथे भाडयाचे खोलीत तिला शितपेयामध्ये दारु टाकुन व पाजुन तिचे सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचे सांगितले वरुन सदर गुन्हयात कलम ३५४,३७६ (२) (एफ), ५०६ सहकलम ५ (एन) (पी), ६ पोक्सो अॅक्टप्रमाणे पोलीस स्टेशन अकोट शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी या प्रकरणात दि.२१.०१.२०२२ पासुन अकोला कारागृहामध्ये बंदिस्त आहे. या प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनचे यांनी तपास करून दोषारोपपत्र तत्कालीन पो.उप.नि. राजेश जावरे यांनी न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात एकूण १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या ज्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन पिडीता मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी व तपासअधिकारी या साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्यात. या प्रकरणात संपूर्ण युक्तीवाद सरकारी वकील अॅड. अजित देशमुख यांनी केला.अकोट शहर पो.स्टे.चे ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी म्हणून अकोट शहर पोलीस स्टेशनचे ए.एस.आय. प्रकाश जोशी व पो.कॉ.आश्विन नवघरे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी न्यायालयात युक्तीवाद केला की, या प्रकरणात सावत्र मुलीवर आरोपीने लैगिंक अत्याचार केला आहे आणि त्याने बाप व मुलीच्या नात्याला काळीमा फासल्याने या अशा आरोपीला दयामाया दाखविल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जावु शकतो. तेव्हा आरोपीला कुठल्याही प्रकारची दया न दाखवता त्याने केलेल्या या गंभीर अपराधा बद्दल त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपी विजय दवंडे याला अल्पवयीन सावत्र मुलीवर लैगिंक अत्याचार केल्या बद्दल आजन्म जन्मठेपेची शिक्षा ६५,०००/- रूपये दंडासह ठोठावली आहे.न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या