अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार धनंजय महादेव सायरे यांना उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल करणे चांगलेच भोवले असून
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज त्यांना दोन लाख रुपयांच्या दंडाचा भरणा करण्याचे आदेश दिले असल्याने अकोला पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर मार्गावरील "महाकाली" रेस्टॉरंटचे संचालक महेंद्रसिंग रघुवंशी यांच्या मुलाला अवैधरित्या अटक करून खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सदरहू गुन्हे खारीज करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांत न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी फाळके व राज दामोदर वाकोडे यांच्या द्विसदस्यीय पीठाने
अखेर काल झालेल्या अंतिम सुनावणी अंती खदान पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे ह्यांना आठ आठवड्यात न्यायालयात दोन लाख रुपयांचा दंड रकमेचा भरणा करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
धनंजय सायरे हे खदान पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये कार्यरत असताना त्यांनी महाकाली हॉटेल संचालकाला धंदा करायचा असेल तर दरमहा ५० हजार रुपये द्यावेच लागतील असा दम दिला होता, मात्र हॉटेल संचालकांनी ते देण्यास नकार दिल्याने ठाणेदार धनंजय सायरे यांनी तत्कालीन एपीआय निलेश करंदीकर व आपल्या स्टाफसह त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचा मुलगा व वहिनी हजर असताना त्या दोघांनाही शिवीगाळ करीत वैभव रघुवंशी ह्याला वाहनात बसवून पोलिस ठाण्यात नेवून त्याच्यावर घरगुती गॅस सिलेंडर वापराचे जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती.
त्याच अटकेदरम्यान त्याचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेण्यात आला होता.ह्या गुन्ह्यातून जामीन घेतल्यावर वैभव रघुवंशीने अकोल्यातील न्यायालयातून हा मोबाईल सुपूर्दनाम्यावर परत मिळविण्या साठी आदेश प्राप्त करून ते खदान पोलिस ठाण्यात जमा केले होते.मात्र तरीसुद्धा त्याला मोबाईल देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.अखेरीस वैभव रघुवंशी यांना हा ओपो कंपनीचा मोबाईल न्यायालयाने दिलेल्या सुपूर्दनाम्यावर परत करण्यात आला होता.
झाल्या प्रकाराणे व्यथित झालेल्या व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या वैभव रघुवंशी याने त्याच्यावर झालेल्या अन्यायाला दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे व एपीआय करंदीकर यांनी हेतुपुरस्सर दाखल केलेला गुन्हा खारीज करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या.ह्या याचिकेवर गेल्या दोन वर्षांपासून सुनावणी सुरू असून त्या याचिकेतील आरोपांवर उत्तर देताना ठाणेदार सायरे व करंदीकर ह्या दोघांनीही असा कोणताही मोबाईल पोलिस कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला होता,ह्यावर स्पष्टपणे नकार दिला असून त्यांनी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात देखील शपथेवर वैभव रघुवंशी याचा मोबाईल ताब्यात घेतल्याचे नाकारले होते.मात्र जेव्हा अकोल्यातील न्यायालयाने दिलेल्या सुपूर्दनाम्याच्या आदेशानुसार वैभव रघुवंशी ह्याला हा मोबाईल ह्याच खदान पोलिसांनी परत दिला होता.अकोल्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी देखील उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात खदान पोलिसांनी अकोल्यातील न्यायालयाने केलेल्या आदेशानुसार सुपूर्दनाम्यावर हा मोबाईल परत देण्यात आल्याचे सांगितले होते.ह्या सर्व बाबी जेव्हा उच्च न्यायालयाच्या समक्ष आल्या तेव्हा न्यायालय देखील संतप्त झाले व त्यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक यांना ह्याबाबत चौकशी करून अहवाल मागितला. राज्याच्या तत्कालीन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ह्यांना देखील ठाणेदार धनंजय सायरे व एपीआय निलेश करंदीकर यांची ह्याबाबत विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते.





0 टिप्पण्या