अमरावती शहरांत वाढत्या गुन्हेगारीवरून आ. संजय खोडके यांचा आंदोलनाचा इशारा...



 अमरावती शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून कारवाईला घेऊन पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अमरावती शहरांत गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजात बदल करण्याची नितांत गरज असल्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी मुख्यमंत्रीस्तरावर रेटून धरली असून याचे पडसाद काल शुक्रवार दि.१७ जुलै रोजी झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले होते.  


   अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असल्याचा आरोप करीत आमदार संजय खोडके यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र टीका केली. शहराच्या सर्वच भागात अवैध धंदे सर्रास सुरु असून त्याठिकाणी गुन्हेगारांची वर्दळ असल्याने गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे राजापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असले तरी गुन्हे शाखेच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा दावा आ.खोडके यांनी केला.  


   पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाशी संबंधित प्रकरणे असतांना सुद्धा त्यांना वरिष्ठांकडून अभय दिल्या जात आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा ठपका आमदार संजय खोडके यांनी ठेवला आहे. अमरावती शहरातील नागरिक या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारत असल्याचे सांगत, "यासंदर्भात पुढील १५ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारू," असा इशारा आमदार संजय खोडके यांनी दिला. 


   यावर जिल्हा नियोजना समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे  म्हणाले कि, पोलीस विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व शहरात भयमुक्त वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अमरावती पोलीस शहर विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन या संदर्भातील  उपाययोजना करू. कायद्याचे उलंघन करणारे व कायद्याच्या आड राहून गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांची कदापिही गय केली जाणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या