जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या आरोपीचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला...



   तेल्हारा पोलीस स्टेशनला दाखल अप.क्र. ७७/२०२५ चे कलम ११८(२) १०३(१),३५२ भान्यासंमधील आरोपी विनोद समाधान तेलगोटे, वय ३८ वर्ष, रा.घोडेगाव ता. तेल्हारा, जि. अकोला यांने शेतीच्या हिस्याचे वादातुन कु-हाडीने जबर मारहाण करुन स्वतःच्या जन्मदात्या आईचा खुन केल्याच्या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज आज दि. १८.०७.२०२६ रोजी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी फेटाळला आहे.या प्रकरणात आरोपी दिनांक २२.०६.२०२५ पासून कारागृहात बंदीस्त आहे.


   या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद सादर केला की, यातील आरोपी विनोद तेलगोटे याने त्याच्या आईला नामे गौकर्णा समाधान तेलगोटे, व वडील नामे समाधान ओंकार तेलगोटे हयांना शेतीच्या हिस्साचे कारणारुन क्-हाडीने डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले असल्याने यातील जखमी नामे गौकर्णा समाधान तेलगोटे हिचा उपचाराम्यान नागपुर येथे डोक्यावर गंभीर वार असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे आरोपीविरुध्द वरील प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला. या प्रकरणामध्ये सरकारी वकील अजित देशमुख यांनी वि. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, या आरोपीने खूनासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे. या प्रकरणात भा.ना.सु.सं. चे कलम १८३ प्रमाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष फिर्यादी, व मृतकाची सुन यांनी त्यांच्या बयानात असे सांगितले की, आरोपी विनोद तेलगोटे याने शेतीच्या हिस्यावरुन कु-हाडीने मारहाण केल्याने गंभीर दुखापत होवुन मृत्यु झाला. तसेच प्रकरणात फिर्यादी जखमी साक्षीदार, व इतर साक्षीदार हे हे या खुनाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये आरोपीच्या आईच्या डोक्यावर चार गंभीर जखमा असल्याचा उल्लेख आहे. आरोपी विनोदने ज्या कु-हाडीने आई व वडीलावर वार केले ती कु-हाड आरोपीने पंचासमक्ष पोलीसांना काढुन दिलेली आहे व पोलीसांनी ती आरोपीकडुन जप्त केली आहे. या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर झाल्यास फिर्यादीवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होवून याच गुन्हयासारखा गंभीर गुन्हा घडून, या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना धमकावू शकतो. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून, दोषारोपपत्र देखील विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे निष्पन्न झालेल्या साक्षीदारांवर आरोपी दबाव आणू शकतो व त्यांना फितूर करण्याची दाट शक्यता आहे. दोषारोपपत्रामध्ये या आरोपीला शिक्षा होण्याइतपत प्रथमदर्शनी पुरावा या प्रकरणात उपलब्ध आहे व खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कायद्यामधे जन्मठेप व फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. केवळ दोषारोपपत्र दाखल झाले म्हणजे परीस्थीतीमध्ये बदल झाला असे म्हणता येणार नाही, कारण प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष या प्रकरणात नोंदविणे बाकी आहे. खुन करणे हा गंभीर अपराध आहे व आरोपीने त्याच्या स्वतःच्या जन्मदात्या आईचा खुन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, व आईचा खुन करणे हे अतिशय लाजीरवाणी बाब आहे. जन्मजात्या आईचा खुन करणा-या आरोपीला जामीन दिल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जावु शकतो. जिने ९ महिने पोटामध्ये वाढवुन आरोपीला जन्म दिला तिचेच जीवन या आरोपीने तिचा खुन करुन संपविले हे अतिशय घृणास्पद कृत्य आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण सरकार पक्षातर्फे या आरोपीला कारागृहामध्ये बंदिस्त ठेवूनच चालवण्यात यावे. त्यामुळे सदरहू आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या