अंगणात झोपलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी रंजित मोरेला ३ वर्ष सश्रम कारावास व ११ हजार रुपये दंड...



   स्वतःच्या घराच्या अंगणात खाटेवर झोपलेल्या ३५ वर्षीय महिलेचा वाईट भावनेने हात ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या, वासनेने आंधळा झालेल्या रणजीत मोरेला गेल्या वर्षीच तेल्हारा पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्यात आज दि.१७.०७.२०२६ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी ३ वर्षे कठोर कारावास व ११ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.
 
    पो.स्टे.तेल्हारा अपराध क्रमांक १८४/२०२५ कलम ७४,७५(२), ३५२ भा.न्या.सं. मधील आरोपी रंजित रामभाउ मोरे वय अंदाजे ३९ वर्ष धंदा मजुरी रा. मनब्दा, ता. तेल्हारा जि. अकोला याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला भारतीय न्याय संहितेचे कलम ७४ प्रमाणे स्त्रीचा विनयभंग होण्याचा संभव असल्याची जाणीव असतांना विनयभंग केल्याबददल ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रु.५,००० (रूपये पाच हजार फक्त) द्रव्यदंड व दंड न भरल्यास एक महिना अधिकचा सश्रम कारावास, भारतीय न्याय संहितेचे कलम ७५ (२) प्रमाणे स्त्रीला लैगिक अनुग्रह करण्याची मागणी किंवा विनंती केल्याच्या आरोपाबद्दल १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रु. ५,००० (रूपये पाच हजार फक्त) द्रव्यदंड व दंड न भरल्यास एक महिना अधिकचा सश्रम कारावास व भारतीय न्याय संहितेचे कलम ३५२ प्रमाणे शांतता भंग करुन स्त्रीचा अपमान केल्याबददल ६ महीने सश्रम कारावासाची शिक्षा व रु. १,००० (रूपये एक हजार फक्त) द्रव्यदंड व दंड न भरल्यास १० दिवस अधिकचा सश्रम कारावास अशा प्रकारे शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दंडाची एकुण रक्कम ११ हजार रुपये आरोपीने भरल्यास पिडीतेला नुकसान भरपाई म्हणुन देण्यात यावी असे आदेश आज दि.१७.०७.२०२६ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश  बी.एम.पाटील यांनी दिले आहेत.




   या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी आहे की, या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की या प्रकरणात दि.११.०६.२०२५ रोजी फिर्यादी यांनी पो.स्टे. तेल्हारा येथे फिर्याद दिली की, दि.११.०६.२५ रोजी रात्री १.३० वा.चे दरम्यान गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे फिर्यादी, फिर्यादीची मुलगी व मुलगा यांचेसह अंगणात खाट टाकुन झोपलेले होते. फिर्यादीचे पती कॅटरींगचे काम करीत असल्याने कामाकरीता तेल्हारा येथे गेलेले होते. तेव्हा फिर्यादी त्यांच्या मुलासह अंगणात झोपलेले असतांना तेथे रंजित मोरे हा आला व जोराजोरात आरडाओरड करत होता त्यामुळे ते सर्व झोपेतुन उठले. रंजित मोरे याने फिर्यादीला शिवीगाळ केली व फिर्यादीने विरोध केला असता त्याने फिर्यादीला वाईट उददेशाने हात पकडुन जवळ ओढुन विनयभंग केला. फिर्यादीने त्याच्या तावडीतुन निसटुन आरडाओरडा केली असता रंजित मोरे हा तेथुन पळुन गेला. नंतर फिर्यादीचे पती रात्री २:०० वा. चे सुमारास घरी आले असता फिर्यादीने त्यांना सर्व हकीकत सांगितली व फिर्यादी तिच्या पतीसह पोलीस स्टेशनला हजर झाले असता फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरुन सदर आरोपीविरुध्द ७४,७५ (२), ३५२ भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा नोंद दाखल झाला व तपासअधिकारी पो.उप.नि.निलेश ठाकरे यांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकुण ७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविल्या त्यामधे प्रामुख्याने पिडीता,फिर्यादी, फिर्यादीचे अल्पवयीन मुलगी,मुलगा व तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबधी युक्तीवाद करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की,आरोपीने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. महिलेवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण अतिशय मोठया प्रमाणात वाढत आहेत. तसेच फिर्यादीने न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे समक्ष नोंदविण्यात आलेल्या बयाणात देखील तिच्या विरुध्द आरोपीने केलेल्या लैंगिक अत्याचाराचा उल्लेख आहे व तसाच पुरावा देखील फिर्यादीने सत्र न्यायालयासमक्ष दिला आहे. अशा आरोपीला दया दाखविल्यास. समाजामध्ये चुकीचा संदेश जावु शकतो. अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा विनयभंग केला असल्याने आरोपीला कुठल्याही प्रकारची दयामया न दाखविता जास्तीतजास्त कठोर शिक्षा देण्यात यावी.


    या प्रकरणात तेल्हारा पो.स्टे.चे ठाणेदार विनोद इंगळे यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार रामेश्वर राउत बं.नं.१८८७ यांनी सहकार्य केले दोन्ही पक्षाच्या अंतीम युक्तीवादानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील, अकोट यांनी आरोपी रंजित मोरे याला वरीलप्रमाणे ३ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा द्रव्य दंडासह ठोठावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या