पोलिस उपअधीक्षक शंकर शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचा पोलिस महासंचालकांच्या हस्ते विशेष सन्मान...



   अकोट येथील बहुचर्चित कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांचा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकां कडून आज विशेष सम्मान करण्यात आला आहे.


  अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोठे बारगण येथील प्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेली लाखो रुपयांची चोरी उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज शुक्रवार दि. १७.०७.२०२६ रोजी मुंबई येथे सन्मानित करून गौरविण्यात आले आहे. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आपल्या दालनात या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

   दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोट येथील कालका माता मंदिरातून अज्ञात चोरट्याने देवीच्या मूर्तीवरील ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७५० ग्रॅम चांदी आणि दानपेटीतील रोख १५,००० रुपये,असा एकूण ४,५४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. २४४/२०२६ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे मंदिर अकोटकरांचे श्रद्धास्थान असल्याने या चोरीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.


अकोला एलसीबीची धडक कारवाई आणि अटक...

  घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी आपल्या सहकाऱ्यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.
 
   
   पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तातडीने एक विशेष पथक गठीत करून त्या  तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावुन अगदी अल्प कालावधीत आरोपी अमोल काशीराम तेलगोटे (वय ३९ वर्ष,रा.रिधोरा, ता.बाळापूर,जि.अकोला) हा असल्याचे निष्पन्न करून त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे पथक थेट रायपूर (छत्तीसगड) येथे रवाना केले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीवर पाळत ठेवून, तो परतीच्या प्रवासात असताना अमरावतीजवळ त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.


  आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त-

   ताब्यात घेतलेल्या आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या ताब्यातून चोरीचे सोन्याचे दागिने, सोन्याची लगड,चांदीचे बिस्कीट, कडे,मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि इतर साहित्य असा एकूण ७,२१,०६८ रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकांकडून पाठीवर कौतुकाची थाप...

   अतिशय गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील असलेल्या या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण व सखोल तपास करून यशस्वी छडा लावल्याबद्दल आज दि. १७ जुलै २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक,सदानंद दाते  यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक करून त्यांचे दालनात स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तथा विद्यमान पोलिस उपअधीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पो.हेकॉ.सुलतान पठाण आणि वसीमोद्दीन यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


    पोलिस महासंचालकांनी विशेष दखल घेऊन  केलेल्या ह्या अकोला पोलिसांच्या या सत्काराबद्दल शंकर शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या