"बेस्ट डिटेक्टशन" मध्ये अकोला पोलीस दलाची पुन्हा राज्यस्तरावर निवड झाली असून अकोला जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे, ज्याची लागोपाठ दोनदा राज्यस्तरीय निवड झाली आहे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते तपास पथकाचा आज मुंबई येथे पोलिस मुख्यालयात प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
अकोला शहरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्र येथे झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा अवघ्या ७२ तासांत छडा लावून आरोपीस जेरबंद करण्याची कारवाई ही अकोला जिल्हा पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात ३३० पेक्षा अधिक CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण, तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत ही कारवाई करण्यात आली होती.या उत्कृष्ट तपासाची दखल घेत सदर गुन्ह्याची माहे जुलै मधील "उत्कृष्ट गुन्हे उकल" अर्थात "बेस्ट डिटेक्शन" म्हणून महाराष्ट्र राज्य स्तरावर निवड करण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज शुक्रवार दि.१८/०९/२०२६ रोजी मुंबई येथे तपास पथकातील तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा विद्यमान पोलिस उपअधीक्षक लोहमार्ग पोलिस अकोला रेल्वेचे शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल खुशाल नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल यांना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस दलातील सर्वोच्च अधिकाऱ्यांकडून मिळालेला हा गौरव अकोला पोलीस दलासाठी निश्चितच अभिमानास्पद तसेच तपास पथकासाठी प्रेरणादायी आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की, दि. ०७/०६/२०२६ रोजी दुपारी आदर्श कॉलनी, अकोला येथील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रात चेहरा झाकलेल्या आरोपीने पिस्तूल व लोखंडी रॉडचा धाक दाखवत सशस्त्र जबरी चोरी केली. या घटनेत ६९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. गुन्ह्याच्या तपासात ३३० CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीच्या पलायनाचा मार्ग अकोला ते भुसावळपर्यंत निश्चित करण्यात आला. तांत्रिक तपासासोबतच प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रोहनसिंग सतनामसिंग बावरा यास दि.११/०५/२०२६ रोजी भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी १७० ग्रॅम सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, असा एकूण २७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यात १३ साक्षीदारांची तपासणी करून दि.२०/०६/२०२६ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
यापूर्वी मे महिन्यात अकोट येथील बहुचर्चित कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारगण येथील प्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेली लाखो रुपयांची चोरी उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा दि. १७/०७/२०२६ रोजी मुंबई येथे गौरव करण्यात आला होता. सदानंद दाते,पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,यांनी आपल्या दालनात या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.
त्यावेळी उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई येथे तपास पथकातील तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, हेड कॉन्स्टेबल वसीमोद्दीन व सुल्तान पठाण यांना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. अकोला जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे ज्याची दोनदा राज्यस्तरीय निवड झाली आहे.याबद्दल तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








0 टिप्पण्या