१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा खटला सुरू असतांना आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला.
आज दि.२४.०७.२६ रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र व विशेष न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल असलेला अप. क्र. १४४/२०२४ भादंवि चे कलम ३७६ (२) (एन) सहकलम ४,५ पोक्सो मधील आरोपी अंकित महादेव खोब्रागडे, वय २१ वर्ष, राहणार पोपटखेड, ता.अकोट,जि.अकोला याने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झाल्या नंतर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
वरील आरोपी या प्रकरणात अकोला दि.१३.०४.२०२४ पासुन कारागृहात बंदीस्त आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात युक्तीवाद केला की, या प्रकरणात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले असून दि.०८.०४.२०२४ रोजी पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे या आरोपी विरुध्द फिर्याद दिली की, तीची १२ वर्षीय अल्पवयीन पीडिता मुलगी, ६ व्या वर्गात शिकत आहे. आरोपीला फिर्यादी व फिर्यादीच्या घरातील सदस्य ओळखतात. दि. ०४.०४.२०२४ रोजी फिर्यादीला म्हणजेच आईला अल्पवयीन पीडितेने सांगीतले की, दि.२८.०२.२०२४ रोजी दुपारी २.०० वा.च्या सुमारास आरोपी अंकितने शाळेजवळून जबरदस्तीने हात पकडून दारु पिणाऱ्या एका बाईच्या घरी घेवून गेला. त्यावेळी ती बाई दारु पिवून पडलेली होती व ती बाई शुध्दीत नसल्याचे पाहून आरोपीने पिडीतेला तिच्या घरात नेले व तिथे त्याने अल्पवयीन पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर दि.०७.०४.२०२४ रोजी अल्पवयीन पीडित मुलगी कोणालाही न सांगता घरून निघून गेली. त्यामुळे संशयावरून पीडित मुलीच्या आईने वरील प्रमाणे रामदासपेठ अकोला येथे मुलीच्या गहाळ होण्याबाबत तक्रार दिली. परंतू, घटनास्थळ हे अकोट ग्रामीण पो.स्टे.असल्याने वरील गुन्हा अकोट ग्रामीण येथे वर्ग करण्यात आला. अकोट ग्रामीणचे तपासी अधिकारी विष्णु बोडखे यांनी सदरहू तक्रार अर्ज तपासात घेतला. त्यांनी अल्पवयीन पीडितेचा शोध घेतला असता, पीडिता मुलगी बडनेरा रेल्वे स्टेशनवर जी.आर.पी. पोलीसांना मिळून आल्याने पोलीस स्टॉफ व पीडितेच्या आईला पाठवून अल्पवयीन पीडित मुलीला आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन पीडितेने तिच्या बयाणामध्ये सांगितले की, आरोपीने दि. २८.०२.२०२४ रोजी व दि. ०१.०३.२०२४ रोजी शाळेजवळ येवून अल्पवयीन पीडितेला त्या बाईच्या घरात नेवून जबरदस्तीने पीडितेसोबत शारिरीक संबंध केले.
सदर प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तीवाद केला की, आरोपी याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. १२ वर्षीय अल्पवयीन पीडितेवर आरोपीने बलात्कार केल्यासंबंधी आरोपीविरूध्द दोषारोपपत्रामध्ये भरपूर पुरावा उपलब्ध आहे. पीडिता अल्पवयीन असल्यासंबंधी तिचा जन्माचा दाखला तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल बालकल्याण समितीसमोर व न्यायाधीशांसमोर कलम १६४ प्रमाणे नोंदविलेले पीडितेचे बयाण इत्यादी महत्वाचे पुरावे दोषारोपपत्रामध्ये उपलब्ध असून, या प्रकरणामध्ये जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा प्रस्तावित आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकार पक्ष आरोपीला कारागृहामध्येच बंदीस्त ठेवून खटला जलद गतीने चालविण्यास तयार आहे. आरोपीला जामीन दिल्यास पीडितेच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो व आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. सरकार पक्ष हा खटला आरोपीला कारागृहातच ठेवुन जलद गतीने चालविण्यास तयार आहे तसेच या प्रकरणात पिडीत मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारासंबधी वरील आरोपी विरूध्द साक्ष दिलेली आहे तसेच इतर महिला साक्षीदारांचे पुरावे न्यायालयात नोंदविणे बाकी आहे. खटला सुरू असतांना जामीन अर्ज दाखल करून आरोपी खटला चालवण्याकरीता विलंब करीत आहे, त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर करावा असा युक्तीवाद जमानत अर्जाला विरोध करतांना सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला व फिर्यादी तर्फे अँड. शुभम सुर्यवंशी यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.


0 टिप्पण्या