जि.प.च्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी "दुश्मनी निभावून" अधिकाऱ्यांना मिळते तरी काय..?




अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील ग्राम करतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम वर्षानुवर्षे अपूर्ण असल्याने लहान लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता त्यासाठी गावकऱ्यांनीच कंबर कसली आहे.


 अकोट तालुक्यातील करतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या अपूर्ण इमारत बांधकामाचा व लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून कसेही करून हा प्रश्न एकदा मार्गी लावायचाच असा निश्चय गावकऱ्यांनी केला आहे.जि.प.च्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी दुश्मनी निभावून अधिकाऱ्यांना मिळते तरी काय..? अशीच भावना आजतरी गावकऱ्यांची झालेली आहे.

   शाळेच्या इमारतीचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार, ‘Reconstruction of ACRs in ZP Primary School Karatwadi’ या प्रकल्पाला सन २०२०-२१ मध्ये मंजुरी मिळाली असून प्रकल्पाचा Project UID – MHED20210139/1 असा आहे. ऑनलाइन प्रणालीवरील नोंदीनुसार या कामाची प्रगती ६० टक्के Work in Progress अशी दर्शविण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात शाळेची इमारत अद्याप पूर्ण झालेली नसल्याने विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधांमध्ये कसेतरी शिक्षण घ्यावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

  शाळेच्या मुख्याध्यापकांनी २८ मार्च २०२६ रोजी संबंधित कार्यालयाकडे पत्र देऊन बांधकामासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या पत्रात मंजूर रक्कम, आतापर्यंत प्राप्त निधी, पुढील बांधकामासाठी आवश्यक निधी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्याच्या Vendor ID संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

   ग्रामस्थ व पालकांनी प्रशासनाकडे केलेल्या निवेदनात अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करावे, उपलब्ध निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही याची पडताळणी करावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या केल्या आहेत.

  शाळेचे बांधकाम दीर्घकाळ अपूर्ण राहिल्याने पालकांमध्ये नाराजी वाढत असून, काही पालक आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये दाखल करण्याचा विचार करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

   आता ग्राम करतवाडीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न प्रशासन किती गांभीर्याने घेते आणि रखडलेले बांधकाम कधी पूर्ण होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

    याबाबत अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून एक निवेदन दिले असून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेंद्र आग्रे यांच्यासह  निवेदनावर नागेश आग्रे, ग्रा.पं. सदस्य, गौतम आग्रे, आदिल पैलवान, चेतन भारंबे, रमेश भारंबे, आम्रपाली आग्रे, अँड.विशाखा आग्रे, राजकुमार आग्रे, पांडुरंग आग्रे, जयशीला डोंगरे, छाया संदेश आग्रे, शुभम आग्रे, माणिक आग्रे, गजानन आग्रे, दिवाकर आग्रे व शिवशंकर कोकाटे ह्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या