इमानदारीचा आव आणत वाळू वाहतुकीच्या धंदेवाईकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील तहसीलदार विजय चव्हाण याला बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख चाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून हवालात दाखविली आहे.
विजय चव्हाण असे या तहसीलदाराचे नाव असून याच तहसीलदाराने अनेक वेळा वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असताना बऱ्याच कारवाया केल्या होत्या. परंतु दुसऱ्या बाजूला याच वाळू माफियांना नियमित हप्त्याची मागणी करीत असल्यामुळे वैतागलेल्या वाळू माफियांनी एसीबीकडे तक्रार देत तहसीलदारालाच लाचेची रक्कम देऊन त्याचा "गेम वाजविला" आहे.
स्वतःला फार मोठा प्रामाणिक अधिकारी सिद्ध करण्यासाठी इमानदारीचा आव आणत मोठ्या कारवाया करणारा अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण फार मोठा लाचखोर निघाला आहे. बीड एसीबीच्या पथकाने शनिवार दिनांक ६/६/२०२६ ला सायंकाळी मोठी कारवाई करीत तहसीलदार विजय चव्हाणला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलंड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच वाळू वाहतूकदाराची वाहने सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने तक्रारदाराकडे तब्बल ७ लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. परंतु तहसीलदाराच्या आवाजवी मागणी व कारवायांनी त्रस्त झालेल्या तक्रारदारने तहसिलदार विजय चव्हाण यांचा "गेम वाजविण्या"साठी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर झालेल्या "फायनल डिमांड" नुसार ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने सापळा लावून तहसीलदार विजय चव्हाण याचा "करेक्ट कार्यक्रम" केला.
सदरहू कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंबडच्या तहसीलदाराला एसीबीने सापळ्यात पकडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.



0 टिप्पण्या